Connect with us

गोवा खबर

फेटा

Published

on

Spread the love
भारत हा परंपरा आणि संस्कृतीचा देश आहे. प्रत्येक गोष्टीत भारतीय संस्कृतीची मोठी छाप आहे. भारतीयांची कला, भाषा, पोषाख आणि खाण-पाण यामध्ये भारतीय संस्कृती दिसून येते. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी संस्कृती आणि त्यानुसार पेहराव परिधान केला जातो. डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारे वस्त्र आवरण घालून उन्हापासून संरक्षण केलं जातं तसेच आपल्या संस्कृतीची ओळखही केली जाते. महाराष्ट्रात फेटा हा पारंपारीक पगडीचा प्रकार आहे.
डोक्यावर धार्मिक किंवा शुभप्रसंगावर बांधल जातं त्याला फेटा अस म्हणतात. कोल्हापूर पासून त्याचा उगम झाला, कोल्हापूर ही महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, संत तुकाराम अशा अनेकांनी डोक्यावर पारंपारिकेतेला अनुसरून पगडी, फेटा, जिरेटोप परिधान केलं आहे. वरिष्ठ पुरुष आपली आदर, प्रतिष्ठा, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फेटा घालतात. साधारणतः कोल्हापूर फेट्याची लांबी 3.5 ते 6 मीटर, तर रुंदी 1 मीटर असते. शौर्याचे, शुरतेचे प्रतिक म्हणून केसरी रंगाचा वापर केला जातो, तर शांततेचे प्रतिक म्हणून पांढऱ्या रंगाचा वापर करतात.
पेशवाईच्या काळात पुणेरी पगडी नावारुपाला आली. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर यांचा व्यक्तीमत्व पगडीमध्ये अधिक शोभून दिसते. पुणेरी पगडी हे एक मानाचं प्रतिक आहे. पाहुण्यांच स्वागत पगडी घालून करण्याची प्रथा पुण्यात प्रचलित आहे. पुणेरी पगडीच्या वरच्या भागाला माथा म्हणतात, उजव्या बाजुचा उंच भाग म्हणजे कोका आणि त्याचे टोक म्हणजे चोच, त्यावर असलेला गोंडा म्हणजे जरतार आणि पगडीच्या कडेच्या पट्टीला घेरा म्हणतात. घेऱ्याखाली कपाळावर येणाऱ्या भागाला कमल तर आतील भागाला गाभा म्हणतात.
दगडुशेठ हलवाई गणपतीला देखील मानाची पगडी घातलेली दिसते, तर 1973 च्या घाशिराम कोतवालच्या नाटकामुळे पुणेरी पगडी जास्त प्रसिद्ध झाली. पुणेरी पगडी ही लाल रंगाची असते, त्याचबरोबर महात्मा फुलेची पगडीही तितकीच लोकप्रिय आहे. हजारो वर्षाची परंपरा अजुनही प्रचलीत आहे. शहरी भागात त्याला अनेक नावं आहेत उसनीसा, किरीट, पट्टा, वेश्टन, वेश्टन पट्टा, शिरोस्त्राण म्हणलं जात. डॉ. गोविंद सदाशिव गुर्ये यांच्या “भारतीय पेहराव” या पुस्तकात अनाधीपासून आतापर्यंतच्या सर्व पगड्यांचा उल्लेख येतो. राजस्थानमध्ये श्रीमंत माणसे रंगबिरंगी पगडी परिधान करतात, तर साधी माणसे एकाच रंगाची पगडी वापरतात ज्याची रुंदी 8 इंच तर लांबी 80 फुटापर्यंत असते. प्रत्येक 40 किलोमिटरवर भाषा बदलाचा व पगडी बांधण्याचा क्रम बदलतो. तर काही ठिकाणी जातीय आधारावर पगडी बांधली जाते. शौर्याचे प्रतिक म्हणून केसरी रंग, तर शोक-संवेदनासाठी मटिया किंवा निळा रंग वापरला जातो.
गर्मीच्या दिवसात आरामासाठी तर कधीकधी विहरीचे पाणी काढण्यासाठी दोर म्हणून उपयोग केला जातो. मेवाड, मारवाड, हाडोती, गोडावण, शेखावटी, मेवत इथे पारंपारीक पगडीचा रिवाज आहे. हिमाचलमध्ये चार प्रकारच्या टोप्या परिधान केल्या जातात. बुशाहरी, कुल्लूवी, किन्नौरी आणि लाहुली इथल्या वेगवेळ्या वातावरणात यांचा उपयोग केला जातो. उत्तरप्रदेशमध्ये “गमशा” चा वापर डोके बांधण्यासाठी केला जातो. काश्मिरमध्ये मेंढराच्या लोकरीचा वापर करून काराकुली टोपी बनवले जाते.
पंजाबमध्ये पगडी ही तशी 8 इंच रुंद व 82 इंच लांब असते, तर “साफा” हा लहान असतो. गुजरातमधल्या कठियावाडी येथे साफा पगडी, अरुणाचल प्रदेशमध्ये ब्योपा, उत्तराखंड मध्ये कुंमांनी, आसाममध्ये झापी, बिहारमध्ये पाग व म्हैसूरमध्ये पेठा म्हणून ओळखली जाते. गोव्यातही मुंडाशे, फेटा अशा नावाने डोकं बांधलं जातं. मध्यमवर्गीय माणूस सण-समारंभाला डोकीला काळी टोपी घालत असे, तर कश्टकऱ्यांचा पोषाख एकदम साधा असे, डोकीला मुंडांशा सारखा बांदलेला पंचा, तर कुळागरी कश्टकरी असेल तर डोकीला पोफळीची विरी किंवा भाती यांचे जिरेटोपाच्या आकाराचे शिरस्त्राण करून वापरत असे.
शिगमो, जत्रा आणि लोकनृत्य यावेळेस डोक्याला फेटा, मुंडाशे बांधण्याची तऱ्हा आहे. धनगर समाजात शिगम्याला “चपय” हा प्रकार असतो किंवा डोकीला खोरबाला वेलचे मुंडाशे असते तर कधी-कधी काठियावाडी प्रकाराचे मुंडाशे असते. डिचोली तालुक्यात घोडमोडणीला घोडे धारण करणारा डोक्याला पगडी बांधतो. तर सांखळी येथे वीरभद्र म्हणून नाचणारी व्यक्ती डोक्याला म्हैसुरी पद्धतीची पगडी बांधतात. काणकोण येथे तोणयामेळात डोक्यात विशिष्ट प्रकारचे पांढरे मुंडाशे बांधले जाते.
समाज जीवनात असलेल्या अनेकविध संकल्पनाचा सम्मुचय म्हणजे संस्कृती आहे. या संस्कृतीत समाज समाविश्ट असलेल्या गोष्ठी मिळून संस्कृती बनते. ती दाखवता येत नाही, आचार-विचारांच्या द्वारा ती अभिव्यक्त होते. आपणही ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न करुया.
  • वरील लेख दामोदर (दामू) ग. नाईक, माजी आमदार, फातोर्डा – गोवा यांनी लिहिला असून ते आता भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशचे सरचिटणीस आहेत.