गोवा खबर:भाजपाने 30 ते 40 कोटी रुपये देऊन काँग्रेसचे आमदार खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला होता त्याला उत्तर देताना काँग्रेस पक्षाची उमेदवारी देताना आपल्यासह इतर उमेदवारांकडून पैसे उकळळे होते,असा आरोप भाजपा मध्ये प्रवेश केलेले आमदार संकल्प आमोणकर यांनी शुक्रवारी केला.
पणजी येथे भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमोणकर म्हणाले , माझ्यासोबत काँग्रेसच्या इतर 12 मतदारसंघाच्या उमेदवारांकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले आहेत.गोवा प्रभारी दिनेश राव आणि के. सी. वेणुगोपाल यांनी हे पैसे उकळले असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला आहे.
आमोणकर म्हणाले , राव आणि वेणुगोपाल यांनी कोट्यावधी रुपयांची माया निवडणुकी वेळी जमवली आहे. आमोणकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रसेबाबत आपली दुखरी बाजू बोलून दाखवली आहे.
दरम्यान कोळशा बाबत आपली पूर्वीची भूमिका कायम आहे.आज आपण मूरगाव पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षाची भेट घेतली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे देखील वास्को मध्ये कोळसा प्रदूषण नको यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी करणार असल्याचे आमोणकर म्हणाले.