सनातनवर बदनामीकारक खोटे आरोप
करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल!
गोवा खबर :गेल्या काही दिवसांपासून श्री. गौतम खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरच्या संदर्भात केलेल्या विधानावरून गोव्यात जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. या वादाचा आडोसा घेऊन काही समाजकंटक सनातन संस्थेला विनाकारण लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संघटना असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले असून, संस्थेच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्यामुळे बंदीची मागणीही फेटाळून लावली आहे. असे असतानाही केवळ हिंदु धर्माचा द्वेष करण्यासाठी संस्थेची बदनामी करणे, हा न्यायालयाचा अवमान आहे. या भारतविरोधी मानसिकतेच्या विरोधात आम्ही फोंडा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून सनातनची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी करत आहोत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली आहे.
फ्रान्सिस झेवियरच्या निमित्ताने काही व्यक्ती फेसबुक आणि अन्य सामाजिक माध्यमांवर पोस्ट्स, तसेच व्हिडिओंद्वारे सनातन संस्था, हिंदु धर्म, साधू-संत व हिंदूंची श्रद्धास्थाने यांची बदनामी करत आहेत. या संदर्भात सनातन संस्थेची अधिकृत भूमिका खालीलप्रमाणे आहे.
१. अनेक व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गौतम खट्टर यांचा कार्यक्रम सनातन संस्थेने आयोजित केला होता. हे विधान असत्य आहे. तो कार्यक्रम ‘सनातन धर्म रक्षा समिती’ या संस्थेने आयोजित केला होता. केवळ द्वेषापोटी सनातन संस्थेचे नाव या वादात ओढून संस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.
२. मडगांव प्रकरणात मा. न्यायालयाने सर्व साधकांची बॉम्बस्फोटाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
३. खुद्द केंद्र सरकारनेही संस्थेच्या विरोधात पुरावे नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. ज्यांना हे निकाल मान्य नाहीत, त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास नाही, असेच म्हणावे लागेल.
‘विवा पोर्तुगाल’च्या घोषणा देणाऱ्या भारतद्वेष्ट्यांचा सनातन संस्थेकडून तीव्र निषेध!
एका व्हिडिओमध्ये “विवा गोवा, विवा पोर्तुगाल” अशा घोषणा देऊन पोर्तुगीज धार्जिण्या मानसिकतेचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सनातन संस्थेवर टीका करणाऱ्या या प्रवृत्तींची निष्ठा भारतमातेशी नसून परकीय सत्तेशी आहे. गोव्यात राहून पोर्तुगालचा जयजयकार करणे हा भारतीय सार्वभौमत्वाचा घोर अपमान आहे.
फ्रान्सिस झेवियरच्या निमित्ताने सनातन संस्थेला लक्ष्य करून केले जाणारे खोटे व बिनबुडाचे आरोप थांबले नाहीत, तर सनातन संस्था अशा लोकांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करेल. आम्ही फोंडा पोलीस ठाण्यात गोव्यातील सेबी वास यांच्यासह इतर दोषी व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करावी, ही आमची मागणी आहे.