Connect with us

गोवा खबर

सनबर्न फेस्टिवल २०२२मध्ये गोवा राज्याचे पर्यटन मंत्री माननीय रोहन खवंटे करणार ‘गोवा व्हिलेज’चे उद्घाटन

Published

on

Spread the love
गोवा खबर: गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्या हस्ते वागातूर-गोवा येथे आयोजित सनबर्न फेस्टिवल गोवा-२०२२मधील ‘गोवा व्हिलेज’चे उद्घाटन २७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
गोवा राज्यातील लोकप्रिय आणि उदयोन्मुख कलाकार व हस्तींच्या माध्यमातून  राज्यातील वैविध्यपूर्ण कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली याबाबत प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने सनबर्न महोत्सव गोवा २०२२मध्ये ‘गोवा व्हिलेज’ हा खास सांस्कृतिक विभाग तयार करण्यात आला आहे. या विभागामध्ये गोमंतकीय संस्कृतीचे वैविध्यपूर्ण पैलू अनुभवता येणार असून त्यातून गोव्याची श्रीमंत निसर्गसंपदा, इतिहास, कला, संस्कृती, संगीत, खाद्यकला आण साहस पर्यटन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्या त्या स्थळांना भेट देण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. गोव्यातील पर्यटन हंगाम ऐन भरात पोचला असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणल्या गेलेल्या या महोत्सवातील ‘गोवा व्हिलेज’च्या माध्यमातून मध्ये स्थापित तसेच उदयोन्मुख कलाकार आपल्या कला-कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.
गोव्यातील वैविध्यपूर्ण सृजनशक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २७ डिसेंबर या उद्घाटनदिनी सेनेनाडर्स सॅम्युअल एरॉन अफोन्सा यांच्या वतीने गाला गोवन वेलकमचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डीजे तेश, डीजे राड, रॅपर अदिल पालयेकर, डॅनियल आणि अलिम यांच्यासमवेत बिट बॉक्सिंग व रॅप, रिझेला दिनिझ आणि डीजे साज अख्तर हे कलाकारही आपली कला पेश करणार आहे. तसेच २८८ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान ‘गोवा व्हिलेज’मध्ये साय ट्रान्स डीजे सनग्लायडर, डिस्कोबार, कलिंगा सन, डीजे नितीन, डीजे स्टार्लिंग, इंडियाज गॉट टॅलेंटफेम संकेत मांद्रेकर या कलाकारांसह विनिता पालेकर आणि ट्रुपच्या वतीने पारंपरिक दीपनृत्य, फुगडी, कुणबी, घोडे मोडणी नृत्य असे विविध गोमंतकीय नृत्यप्रकार सादर करणार आहेत.
तसेच ‘गोवा व्हिलेज’मध्ये आणखी काही आकर्षण म्हणजे गोव्यातील वास्तुकलेचे नमुने असलेले रंगबिरंग, वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रवेशद्वारांच्या प्रतिकृती ‘डोअर्स ऑफ गोवा’मध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच किनारा आणि वैविध्यपूर्ण बोटींतून गोव्यातील भौगोलिक रचना दर्शवणारे बॅकड्रॉप असलेली आकर्षक छायाचित्रे; गोव्यातील नामवंत कलाकारांच्या कलाकृती; डोअर्स ऑफ गोवा; आणि गोवा पर्यटन विभागाने उभारलेली त्रिमितीय ‘आय लव गोवा’ रचनाकृती’ आदींचा समावेश असेल.
या विभागाजवळच अनेक लोकप्रिय, नामवंत गोमंतकीय कलाकारांच्या योगदानाप्रती अभिवादन  करण्याच्या उद्देशाने ‘लेजंड्स ऑफ गोवा’ हे दालनही उभारण्यात आले आहे. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्टुन चित्रांसाठी जगप्रसिद्ध असलेले पद्म विभूषण पुरस्कार प्राप्त मारियो मिरांडा (१९२६-२०११), लोकप्रिय मॉडेल कँडिस पिंटो अशा कलाकारांचा समावेश आहे.
तसेच ‘लेजंड्स ऑफ गोवा’मध्ये नामांकित संगीतकार, गायक आणि बँड यांचाही समावेश असून यामध्ये भावगीत गायक अजित कडकडे; हिंदुस्थानिक शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर (१८८३-१९७४); वायोलिनवादक अंतोनियो फोर्तुनातो डि फिगिरेदो (१९०३-१९८१); अकॅडेमया डि म्युझिका चे संस्थापक आणि संचालक आण ऑर्केस्ट्रा सिन्फोनिका डि गोवा (गोवा सिम्फनी ऑर्क्रेस्टा)चे संस्थापक-संचालक; आर.डी. बर्मन, प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांचे गुरू तसेच १९५० व १९६०च्या दशकात अनेक दिग्गज संगीतकारांसमवेत काम केलेले नामांकित वायोलिनवादक अँथनी गोन्साल्विस (१९२७-२०१२); गोमंतकीय संगीतातील बादशाह ख्रिस पेरी; झॅज गोवाचे झॅज निर्माते व बासवादक कोलिन डिक्रूझ; हिंदी सिनेसृष्टीतील संगीत दिग्दर्शक दत्ता नाईक; शास्त्रीय संगीत गायक व कलाकार दिनानाथ मंगेशकर; पॉप गायक इस्थर एडन; संगीतकार, वायोलिनवादक आण ट्रम्पेटवादक फ्रँक फर्नांड; प्रसिद्ध पार्श्वगायिका हेमा सरदेसाई; कॅनेडियन रॉक बँड बिली टॅलेंटमधील गितारवादक आयन डिसा; भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कलाकार जितेंद्र अभिषेकी; केशरबाई केरकर (१८९२-१९७७); घुमट व तबला वादक खाप्रुमामा पर्वतकर (१८७९-१९५३); शास्त्रीय संगीत क्षेत्रातील गायिका किशोरी अमोणकर; गायिका लिओन्सी; कोकणी गायिका लॉर्ना कार्देरो; संगीतकार लॉर्डिनो बार्रेटो; शास्त्रीय गायिका मोगुबाई कुर्डीकर; गायक व गीतकार ऑलिवर सीन; हिंदुस्थानी शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर; नाट्य गायक व कलाकार प्रसाद सावकर; संगीत नाटक संगीतकार रामदास कामत, संगीतकार व बॉलिवूड गायक रेमो फर्नांडिस; संगीतकार सेबेस्टिन डिसोझा; गायिका सोनिया सिरसाट; शास्त्रीय गायक सुरेश हळदणकर; आणि संगीतकार व संवादिनी वादक तुळशीदास बोरकर यांचाही समावेश आहे.
‘लेजंड्स ऑफ गोवा’मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू पीटर पॉल फर्नांडिस (बर्लिन ऑलिम्पिक्स १९३६मध्ये सुवर्णपदक विजेत्या पुरुष हॉकी संघातील खेळाडू); वॉल्टर डिसोझा, लॉरी फर्नांडिस, मॅक्सी वाझ, लिओ पिंटो आणि रेजिनाल्ड रॉड्रिग्ज (लंडन ऑलिम्पिक्स १९४८ मध्ये सुवर्णपदक विजेत्या पुरुष हॉकी संघातील खेळाडू); मेरी डिसोझा सिकेरा (हेलंसिकी ऑलिम्पिक्स १९५२मध्ये पात्र ठरलेली पहली भारतीय महिला अॅथलिट); लेवी पिंटो (हेलंसिकी ऑलिम्पिक्स १९५२मध्ये १०० मीटर स्पर्धेतील धावपटू); नेविली डिसोझा (मेलबर्न ऑलिम्पिक्स १९५६मध्ये पुरुष फुटबॉल प्रकारामध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध गोलची हॅटट्रिक नोंदवलेला व संघास चौथे स्थान मिळवून दिलेला खेळाडू); फार्तुनाटो फ्रॅन्को (रोम ऑलिम्पिक्स १९६०मधील पुरुष फुटबॉल संघातील खेळाडू); अँथनी फ्रान्सिस कुतिनो (टोकियो ऑलिम्पिक्स १९६४मधील ४०० मीटर रिले स्पर्धेत उपांत्य फेरीत धावलेले धावपटू); स्टेफी डिसोझा (टोकियो ऑलिम्पिक्स १९६४मधील ४०० मीटर रिले स्पर्धेतील महिला धावपटू); एडवर्ड सिकेरा (म्युनिच ऑलिम्पिक्स १९७२मधील पुरुषांच्या ५००० मीटर धावणे स्पर्धा धावपटू); डॉ. वेस पेस (म्युनिच ऑलिम्पिक्स १९७२मधील पुरुष हॉकी स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या संघातील सदस्य); मर्विन फर्नांडिस (मॉस्को ऑलिम्पिक्स १९८०मधील पुरुष हॉकी स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या संघातील सदस्य तसेच लॉज एंजेलिस ऑलिम्पिक्स १९८४ व सेऊल ऑलिम्पिक्स १९८८मधील पुरुष हॉकी संघातील सदस्य); मार्गारेट टोस्कानो, सेल्मा डिसिल्वा, लॉरेन फर्नांडिस आणि एलिझा नेल्सन (मॉस्को ऑलिम्पिक्स १९८०मध्ये महिला हॉकी स्पर्धेत चौथे स्थान पटकावलेल्या संघाच्या सदस्य); ज्योकिम कार्वालो (लॉज एंजेलिस ऑलिम्पिक्स १९८४मध्ये पुरुष हॉकी संघातील सदस्य); डॅरिल डिसोझा (बार्सिलोना ऑलिम्पिक्स १९९२मध्ये पुरुष हॉकी संघातील सदस्य); लियांडर पेस (अटलांटा ऑलम्पिक्स १९९६ स्पर्धेत कांस्य पदक विजेत्या पुरुष एकेरी टेनिस संघातील सदस्य तसेच अशियाई क्रीडा स्पर्धा (१९९४ ते २०१६)मध्ये ५ सुवर्ण पदकांचा विजेता आणि १ ग्रँडस्लॅम किताब पटकावलेला आंतरराष्ट्रीय टेनिसपटू); दिलीप सरदेसाई (माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू) यांचाही समावेश आहे.
गोवा व्हिलेजमध्ये फ्ली मार्केटही मांडण्यात येणार असून यामध्ये खास गोमंतकीय कपडे, साहित्य, हस्तकला उत्पादने नारळापासून हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेली उत्पादने, रंगीत शिंपले आणि इतर अनेक उत्पादने विक्री व प्रदर्शनासाठी उपलब्ध असतील.
तसेच खास गोमंतकीय मसाले, चटण्या, काजू, लोणची आणि इइतर खाद्यपदार्थांच्या दालनांनाही येथे विशेष स्थान देण्यात आले असून या दालनात प्रत्यक्ष खरेदी किंवा खरेदी करून भारतात कोठेही डिलवरीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
गोवा व्हिलेज अन्नपदार्थ दालनात स्थानिक शेफद्वारे बनवलेले नानाविध गोमंतकीय पारंपरिक तसेच आधुनिक खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. या दालनातील आसन विभागात लाकडी बाकड्यांवर बसून मेजवानीचा आनंद घेताना सुशेगादपणाची अनोखी संगीतमय अनुभूती मिळणार आहे.
गोवा बारमध्ये उराक, फेणी, काबो यासारख्या पारंपरिक गोमंतकीय पेयांचा आस्वाद घ्यायला मिळेल. तसेच अशा खाद्यपेयांचा इतिहास, त्यांची निर्मितीपर्क्रिया याबाबतही माहिती मिळेल. अनुभवी मिक्सॉलॉजिस्टद्वारे या पारंपरिक पेयांचे रुपांतर आधुनिक कॉकटेलमध्ये कसे केले जाते याचा प्रत्यक्ष अनुभवही पाहायला मिळणार आहे.
याबाबत गोव्याचे पर्यटन मंत्री माननीय श्री. रोहन खंवटे म्हणाले, “१६ वर्षांच्या या प्रवासात सनबर्नद्वारे प्रथमच वागातूर येथे गोवा व्हिलेजचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय मंचावरून गोमंतकीय संस्कृती, वारसा जगासमोर मांडण्यासाठी ‘गोवा व्हिलेज’ राबवण्याची ही शासनाची संकल्पना आहे. गोव्याला सर्जनशील कलेची दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. या कलाकारांना जागतिक पातळीवर जगभरात नावाजलेल्या कलाकारांच्या साथीने आपले कला-कौशल्य सादर करण्यासाठी एका खास व्यासपीठाची या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.”
डेल्टिनचे सीईओ आणि अध्यक्ष (ऑपरेशन्स) अनिल मालानी म्हणाले, “सनबर्न २०२२मध्ये गोवा व्हिलेजच्या उभारणीत सह-सादरकर्ते म्हणून सहभागी होताना डेल्टिनमध्ये आम्हास मोठा अभिमान आहे. दशकभराहून अधिक काळ डेल्टिन गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन देत आहे. राज्यातील आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासामध्ये डेल्टिन सतत आपले योगदान देत आहे. सनबर्न सारख्या लोकप्रिय उपक्रमामध्ये गोमंतकीय कलाकारांना संधी देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ सादर करण्याच्या विचारामध्ये सनबर्न आणि डेल्टिन यांची एकच भूमिका असल्याचा आम्हाला आनंद आहे.”
सनबर्नचे सीईओ करण सिंह म्हणाले, “गेली १६ वर्षे सनबर्न आणि गोवा हे एक अतूट असे नाते, समीकरण तयार झाले आहे. गोवा व्हिलेजच्या उभारणीबाबतची घोषणा म्हणजे जगातील या सुंदर स्थळाला, गोमंतकीय जनतेने आजवर दिलेले प्रेम व सर्व सहकार्यतसेच जागतिक पटलावर सनबर्नला यशस्वी ब्रँड बनवण्याकामी दिलेल्या योगदान यासाठी परत काहीतरी देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. गोवा पर्यटन खात्यच्या सहकार्यातून राज्यातील वैविध्यपूर्ण, श्रीमंत कला व संस्कृती वारसा सादर करण्यासाठी स्थानिक गोमंतकीय कलाकारांसमवेत काम करण्याचे आणि त्याचबरोबर जगासमोर आपले कलाकौशल्य सादर करण्यासाठी सनबर्नचे हे जागतिक व्यासपीठ त्यांना उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोमंतकीय संस्कृतीदर्शनाबरोबरच स्थानिक गोमंतकीय कलाकारांनाही सर्व जगासमोर आपले कलाकौशल्य सादर करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गोवा व्हिलेजच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय संगीताची मजा लुटत गोमंतकीय चव, स्वादाची मेजवानाही प्रेक्षकांना सनबर्न फेस्टिवल २०२२मध्ये मिळणार आहे.”
सर्व नोंदणीकृत पाहुण्यांसाठी २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत गोवा व्हिलेजमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तर सनबर्न महोत्सवात तिकिट खरेदी केलेल्या संगीतप्रेमींसाठी २८ ते ३० डिसेंबर २०२२ या काळात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. गोवा व्हिलेजमध्ये मोफत प्रवेशासाठी https://in.bookmyshow.com/events/goa-village-sunburn/ET00347773 या लिंकवरून नोंदणी करता येईल.
सनबर्न गोवा व्हिलेजमध्ये गोमंतकीय कला, संस्कृती, खाद्यकला व स्थानिक मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी १०,०००हून अधिक पाहुणे सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
‘भविष्य वर्तमान आहे’ (The Future Is Now) या केंद्रिभूत संकल्पनेवर आधारित यंदाचा सनबर्न फेस्टिवल गोवा २०२२ या तीन दिवसीय लाइव उपक्रमामध्ये सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक डान्स संगीत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्चकोटीचे मनोरंजन अनुभवावयास मिळणार आहे. या महा-महोत्सवामध्ये फ्ली मार्केट, तसेच सनसेट पॉइंटसह विविध मनोरजंनात्मक उपक्रम, ओपन एअर सिनेमा, बंजी जम्पिंग, झिप लाइन, फेरी व्हिल, विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ आणि उपक्रम यांचाही समावेश असेल. तसेच नामांकित आंतरराष्ट्रीय व भारतीय कलाकारांसमवेत या महोत्सवादरम्यान विविध आफ्टर-पार्टींची मेजवानीही लुटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यंदा महोत्सवाच्या उद्घाटनाची पार्टी २७ डिसेंबर रोजी तर सांगता पार्टी नववर्षाच्या संध्याकाळी होणार आहे.
या उपक्रमाच्या आयोजनादरम्यान सर्व शासकीय नियम, कायदा, मार्गदर्शन नियमावली, शासकीय मान्यता तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी सर्वोत्तम सुरक्षा प्रक्रिया यांचे पालन केले जाणार आहे.
सनबर्न गोवा व्हिलेज उपक्रमासाठी क्रोमा, डेल्टिन या ब्रँडचे सहकार्य लाभले आहे.