गोवा खबर: अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी लाभलेल्या ‘सनबर्न’ या ‘ईडीएम्’ महोत्सवाला दिलेली मान्यता शासनाने त्वरित रहित करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी कु. मामू हागे (आय.ए.एस्.) यांच्याकडे २१ डिसेंबर या दिवशी एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘भारत माता की जय’ संघटनेचे (मध्य गोवा) जागरणप्रमुख श्री. रामदास सावईवेरेकर, ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे श्री. सुरेश डिचोलकर, महिला संघटनेच्या सौ. हेमश्री गडेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राज बोरकर आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांचा समावेश होता.
या निवेदनात म्हटले आहे की, गोव्यात २७ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘सनबर्न महोत्सवा’चे आयोजन होत आहे. ‘सनबर्न’ सारख्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला अमली पदार्थाच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ‘ईडीएम्’मध्ये अमली पदार्थांच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या घटनांमुळे देवभूमी गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झाले आहे. गोवा अमली पदार्थमुक्त करणे, खरेतर अपेक्षित आहे; मात्र पर्यटनाच्या नावाने ‘ईडीएम्’ला प्रोत्साहन देणे म्हणजे एकप्रकारे अमली पदार्थ व्यवसायाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देण्यासारखे होणार आहे. गोव्यात स्थानिकांनी ‘सनबर्न’ महोत्सवाला सातत्याने विरोध केल्यानंतर हा महोत्सव पुणे येथे काही वर्षे घेण्यात आला.
पुणे येथेही ‘सनबर्न’ महोत्सवाला कायदाद्रोही पार्श्वभूमी लाभलेली आहे. ‘सनबर्न’सारखे ‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे. ‘सनबर्न’ महोत्सवाला शासनाने दिलेली मान्यता त्वरित रहित करावी आणि कार्यक्रमाची तिकीटविक्री बंद करावी. गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी.
‘सेरेंडिपिटी आर्टस् फेस्टीव्हल’मध्ये संत तुकाराम महाराज आणि श्री गणपति यांचे होत असलेले विडंबन त्वरित थांबवावे
‘सेरेंडिपिटी आर्टस् फाऊंडेशन’ यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या ‘सेरेंडिपिटी आर्टस् फेस्टीव्हल २०२२’मध्ये संत तुकाराम महाराज आणि श्री गणपति ही कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना करण्यात येत आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचली आहे. ही विडंबन त्वरित थांबवावी. या प्रकरणी संबंधित कलाकार आणि आयोजक यांच्या विरोधात कलम ‘295 अ’ अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा प्रविष्ट करावा.