Connect with us

गोवा खबर

वीज संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करा: ढवळीकर

Published

on

Spread the love

 गोवा खबर:वीज संवर्धनाबाबत जनजागृती ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन वीज मंत्री श्री रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर यांनी राज्य नियुक्त एजन्सी, विद्युत खाते गोवा यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कार्यक्रमात सर्वसमावेशक मार्गदर्शक एनर्जी क्लब मॅन्युअलचे प्रकाशन केल्यानंतर केले.

उर्जा सचिव श्री अजित रॉय, आयएएस, मुख्य विद्युत अभियंता श्री स्टीफन फर्नांडिस, गोवा विज्ञान केंद्राचे संचालक श्री विलास चौधरी, अधिक्षक अभियंता, श्री मयूर हेदे आणि वीज खात्याचे नोडल अधिकारी श्री राजीव सामंत  यावेळी उपस्थित होते.

ऊर्जा संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याने दर्जेदार वीज उपलब्ध करून देणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असल्याची माहिती श्री ढवळीकर यांनी दिली आणि ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एनर्जी क्लब मॅन्युअल, हा शिक्षकांसाठी मार्गदर्शक असून राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शाळांमध्ये एनर्जी क्लब सुरू करण्यासाठी वितरित केले जातील असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की सदर खाते विविध स्पर्धांचे आयोजन करीत असून अशा स्पर्धांद्वारे ऊर्जा वाचविण्याच्या मार्गांबाबत जनजागृती केली जाते. मोबाईल व्हॅन प्रत्येक तालुका, प्राथमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांना भेट देऊन त्यांना ऊर्जा संवर्धनाविषयी जागरूक करण्यासाठी आणि ऊर्जा पुरेशी सेवा कशी व्यवस्थापित करावी याबद्दल माहिती प्रसारित करीत आहे असे ते म्हणाले. पथनाट्यांचा उपयोग जनजागृतीसाठी प्रभावी साधन म्हणून केला जाऊ शकतो आणि खात्याने त्याची अंमलबजावणी करावी  असा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी श्री ढवळीकर यांनी मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्राने राज्य नियुक्त एजन्सी, विद्युत खाते गोवा यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरणही केले.

उर्जा सचिव श्री अजित रॉय, आयएएस यानी या प्रसंगी बोलताना ऊर्जा संवर्धन हा जीवनाचा एक मार्ग असला पाहिजे आणि विद्यार्थी ऊर्जा बचतीसाठी लागू केलेल्या विविध उपाययोजनांचे पालन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात असे सांगितले. आज विजेची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे  त्यामुळे जी काही ऊर्जा निर्माण केली जात आहे ती प्रभावीपणे वापरली जाणे आवश्यक आहे. शक्य तितकी ऊर्जा वाचविण्याचा प्रयत्न करा. संवर्धन प्रामुख्याने वर्तनातील बदलांद्वारे केले जाऊ शकते. काही तांत्रिक नवकल्पनांसह कार्यक्षमता सुधारली जाऊ शकते. वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या संसाधनांचा पर्यावरणावर खूप परिणाम होतो. विद्यार्थ्यांनी अधिक नाविन्यपूर्ण उपायांवर विचार करणे आवश्यक आहे ज्याद्वारे अधिक चांगल्या आणि स्वच्छ मार्गाने वीज निर्माण करता येईल  असेही ते म्हणाले.

मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस  यांचेही यावेळी भाषण झाले. सुरवातीस नोडल अधिकारी श्री राजीव सामंत यांनी स्वागत केले तर अधिक्षक अभियंता श्री मयूर हेदे यांनी आभार मानले. प्रवीण सबनीस यांनी सूत्रसंचालन केले.