Connect with us

गोवा खबर

पर्पल फेस्ट २०२३मध्ये रंगणार १०वी मिस अँड मिस्टर डीफ इंडिया २०२३ स्पर्धा

Published

on

Spread the love

 

 

 

 गोवा खबर:दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय, गोवा शासन यांच्या वतीने ऑल इंडिया डीफ आर्ट्स अँड कल्चरल सोसायटी (एआयडीएसीएस), नवी दिल्ली तसेच गोवा असोसिएशन ऑफ दि डीफ या संस्थांच्या सहकार्याने १०व्या मिस अँड मिस्टर डीफ इंडिया २०२३ या भारतातील युवा वार्षिक सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ६ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान गोव्यात होणाऱ्या पर्पल फेस्ट उपक्रमाचा भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

 

जुने गोवे येथील दि गेरा स्कूल (टीजीएस)च्या सभागृहामध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारतातील बधीर (डीफ) युवावर्गाला आपले कौशल्य सादर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्या माध्यमातून फॅशनच्या दुनियेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. तसेच अशा प्रकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची कवाडेही या उपक्रमातून त्यांच्यासाठी उघडी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना अशिया, युरोप व जागतिक स्तरावरील मिस अँड मिस्टर डीफ स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे.

 

गत २० वर्षे एआयडीएसीएस ही संस्था भारतातील बधीर (डीफ) नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक तसेच कनिष्ठ श्रेणीमध्ये नृत्य, नाटक व अभिनयाबाबतचे सार्वजनिक उपक्रम आयोजित करत आली आहे. २००८-०९ साली झालेल्या मिस अँड मिस्टर डीफ इंटरनॅशनल स्पर्धेपासून प्रेरणा घेत एआयडीएसीएसने भारतातील बधीर (डीफ) युवकांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी आणि त्या माध्यमातून या युवकांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मिस अँड मिस्टर डीफ इंडिया उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या पुढे या युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्पर्धा करण्यास प्रोत्साहन देणे सुरू झाले.

 

यंदा ऑल इंडिया डीफ आर्ट्स अँड कल्चरल सोसायटीद्वारे दिव्यांग व्यक्ती कल्याणसाठीचे राज्य आय़ुक्त कार्यालय, गोवा आणि गोवा असोसिएशन ऑफ दि डीफ (जीएडी) यांच्या सहकार्याने गोव्यामध्ये या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. वैविध्यपूर्ण रसिकवर्गाचा मोठा प्रतिसाद लाभल असलेल्या व जानेवारी २०२३मध्ये होणाऱ्या पर्पल फेस्टमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

 

ही स्पर्धा चार फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. पहिली फेरी ही कॅज्युअल राउंड असेल. यामध्ये स्पर्धक जीन्स, टी-शर्ट असे कॅज्युअल श्रेणीतील पेहराव सादर करतील. सांस्कृतिक फेरीमध्ये आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या त्या राज्यातील पेहराव संस्कृतीचे प्रदर्शन स्पर्धक घडवणार आहेत.

 

त्यानंतर फॉर्मल पेहराव फेरीमध्ये स्पर्धक गाउन व सूट ही थीम असेल. यामध्ये स्पर्धक नृत्य, अभिनयाच्या माध्यमातून आपले कौशल्य सादर करतील. या स्पर्धकांची श्रवण मता कमी असल्याने या स्पर्धेतील प्रश्नोत्तरांची फेरी ही भारतीय सांकेतिक भाषा (साइन लँग्वेज) माध्यमातून होणार आहे. स्पर्धक आणि प्रेक्षावर्ग यांच्यात सुलभ संवादासाठी व्यावसायिक सांकेतिक चिन्ह दुभाषी यांची नियुक्ती केली गेली आहे.

 

या स्पर्धेची माहिती देताना राज्य दिव्यांग व्यक्ती कल्याण आयुक कार्यालयाचे सचिव ताहा हाझिक म्हणाले, “१०व्या मिस अँड मिस्टर डीफ इंडिया २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अशा प्रकारचा उपक्रम गोव्यात प्रथमच होत असून या उपक्रमामुळे गोव्यातील श्रवण समस्या असलेल्या लोकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.”

 

“आमच्या अपेक्षा खूप आहेत. गोव्यातील बधीर (डीफ) लोकांना एक वेगळा अनुभव या उपक्रमातून मिळणार आहे. हा उपक्रम गोव्यातील बधीर (डीफ) युवावर्गाला नक्कीच प्रेरणा देईल आणि फॅशनच्या दुनियेत करिअर आजमावण्यासाठीही प्रोत्साहन देईल,” असा विश्वास गोवा असोसिएशन ऑफ दि डीफचे सरचिटणीस प्रसाद जोशी यांनी व्यक्त केला.

 

“गोव्यामध्ये १०वी मिस अँड मिस्टर डीफ इंडिया स्पर्धेचे आयोजन होत असल्याने आम्ही खूप उत्सुक आहोत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये राज्य दिव्यांग व्यक्ती कल्याण आय़ुक्त कार्यालय आणि जीएडी यांच्या माध्यमातून सर्वोतपरी व सकारात्मक सहकार्य करू. गोवा राज्य हे नेहमीच सकारात्मक ऊर्जेने भारलेले राज्य आहे. हा उपक्रम संस्मरणीय ठरावा यासाठी आम्ही सर्वजण खूप मेहनत घेत आहोत. तसेच इतर राज्यांतही या उपक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी बस व रेल्वे सेवा सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत,” अशी माहिती एआयडीएसीएसच्या उपाध्यक्ष मोनिका पंजाबी वर्मा यांनी दिली.

 

सर्व स्पर्धक तसेच रसिकांसाठी हा उपक्रम संस्मरणीय असाच असेल. समानता, सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण या विचारमूल्यांचा प्रसार या उपक्रमातून होणार आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये या स्पर्धेला मोठे यश व वलय मिळाले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवण्यासाठीचेही व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आजवर निष्ठा, देशना आणि वर्षा यांनी मिस डीफ एशियाचा मुकुट आपल्या माथ्यावर मिरवला आहे. तर २०१९ साली विदिशा बालियान हिने मिस डीफ वर्ल्डचा किताब पटकावला आहे.