Connect with us

क्रीडा खबर

ओदिशा एफसीविरुद्ध एफसी गोवाला विजय आवश्यक

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर: इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) महत्त्वपूर्ण लढतीत शनिवारी (10 डिसेंबर) घरच्या पाठिराख्यांसमोर एफसी गोवा संघ ओदिशा एफसीशी दोन हात करेल. फातोर्डो येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार्‍या सामन्यात यजमानांना विजय आवश्यक आहे.

 

एफसी गोवा संघाच्या खात्यात 8 सामन्यांतून 12 गुण आहेत. आयएसएल 2022-23च्या पॉइंट्स टेबलमध्ये ते सध्या सहाव्या स्थानी आहेत. आणखी एक विजय मिळवल्यास कार्लोस पेना यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाला प्ले-ऑफ फेरीतील आव्हान राखता येणार आहे. दुसरीकडे, यजमान गौर्सना रोखण्यात ओदिशा एफसीला यश आल्यास गुणतालिकेत थेट दुसर्‍या स्थानी झेप घेण्याची त्यांना संधी आहे. ओदिशा संघ सध्या 8 सामन्यांतून 18 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

 

यंदाच्या हंगामात संमिश्र यश मिळवलेल्या गौर्सना मागील दोन सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांकडून मात खावी लागली आहे. शनिवारी, होमग्राउंडवर त्यांच्यासमोर सलग तिसरा पराभव टाळण्याचे आव्हान आहे. पाहुणा ओदिशा संघ चांगलाच फॉर्मात आहे. त्यांना विजयाचा चौकार ठोकण्याची संधी आहे. मात्र, त्यांना अद्याप एफसी गोवाला पराभूत कराता आलेले नाही.

गॅफरचे म्हणणे

बंगळूरू एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्याविरुद्धच्या पराभवानंतरही एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी त्यांच्या खेळाडूंची पाठराखण करताना सर्वोत्तम खेळ करण्याची क्षमता असल्याचे सांगितले.

 

कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाशी दोन हात करण्याची आमच्यात क्षमता आहे. मागील दोन सामन्यांत खेळ ढेपाळला. मात्र, घरच्या पाठिराख्यांसमोर खेळ उंचावेल, असा विश्वास 38 वर्षीय पेना यांनी व्यक्त केला.

 

प्रतिस्पर्धी संघाला आम्ही कधीही कमी लेखत नाही. यावेळचा ओदिशा एकसी संघही परिपूर्ण आणि कॉन्फिडंट आहे. मात्र, प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने आणि कमकुवत बाबी याकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही मागील पराभवातील चुका टाळण्याचा प्रयत्न करू. यंदाच्या हंगामात एफसी गोवाने चार विजय नोंदवले आहेत. त्यामुळे ओदिशाशी दोन हात करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे पेना पुढे म्हणाले.

 

यजमान एफसी गोवाला ओदिशा एफसीविरुद्ध इडू बेडियाची अनुपस्थिती जाणवेल. मुंबई सिटी एफसीविरुद्ध त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले. इडू हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, नियमांचेही पालन करावे लागेल. त्याच्यासारखे अनेक खेळाडू आमच्याकडे आहेत. त्यांना शनिवारी संधी देण्याला आमचे प्राधान्य राहील. आम्हाला एक परिपूर्ण संघ बनवायचा आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची चाचपणी करू, असे पेना यांनी सांगितले.

पुढील आव्हाने

एफसी गोवा आणि ओदिशा एफसी यांच्यातील खेळात खूप साम्य आहे. चेंडूवर अधिकाधिक ताबा मिळवण्यासह मिडफिल्डवर ते अधिक अवलंबून असतात. दोन्ही क्लबचे कोच हे स्पेनचे आहेत. त्यामुळे शनिवारी कोण वरचढ ठरतो, याची उत्सुकता आहे.

 

इडू बेडियाची अनुपल्बधता एफसी गोवासाठी चिंतेची बाब ठरू शकते. त्याच्या जागी सक्षम खेळाडू खेळवण्याचे आव्हान पेना आणि सहकार्‍यांसमोर आहे. हा स्पॅनिश मिडफिल्डर मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. बंगळूरू एफसीविरुद्ध बेडियाच्या गैरहजेरीचा फटका एफसी गोवाला बसला.

 

यजमानांच्या दृष्टीने उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी ओदिशाविरुद्ध आजवर पराभव पाहिलेला नाही. आजवर दोन्ही संघ सहा वेळा आमनेसामने आलेत. त्यात 4 सामन्यांत एफसी गोवा संघाने बाजी मारली आहे. 3 सामने ड्रॉ झालेत. शनिवारी गौर्स संघ प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.