गोवा खबर:विविधतेचा महोत्सव म्हणून नावलौकिक असलेल्या पर्पल फेस्ट या महोत्सवाचे आयोजन ६ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान पणजी-गोवा येथील गोवा मनोरंजन संस्थेमध्ये होणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठीचे राज्य आयुक्त, गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आण गोवा मनोरंजन संस्था यांच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
आज पर्पल फेस्टच्या वतीने या महोत्सवात सहभागासाठी नावनोंदणीची अंतिम मुदत २० डिसेंबर २०२२ असल्याचे जाहीर करण्यात आले. नावनोंदणी https://scpwd.goa.gov.in/ या वेबसाइटवर करता येते. सर्व गोमंतकीयांसाठी नावनोंदणी मोफत असून कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
या तीन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून एकमेकांस मदत करण्यासाठी आणि सर्वसमावेशकतेचे दर्शक घडवण्यासाठी लोक कशा प्रकारे एकत्र येतात याचे प्रदर्शन घडणार आहे. थेट सादरीकरण, प्रदर्शन, क्रीडा उपक्रम, वैविध्यपूर्ण अनुभवात्मक विभाग आणि सर्जनशील मेळा असे विविध उपक्रम या महोत्सवात होणार आहेत. तसेच विविध स्पर्धा, चित्रपटांचे स्क्रीनिंग, मेगा कार रॅली यांसह शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि स्वावलंबी जीवन याबाबत चर्चात्मक उपक्रमही या महोत्सवात होणार आहेत.
तसेच दिव्यांग व्यक्तींना भेडसावणारे उपेक्षा, भेदभाव, कलंक, वगळले गेल्याचा अनुभव किंवा वेगळ्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन अशा प्रकारचे अडथळेही दूर करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आखण्यात आला आहे. मानसिक, शारिरीक, प्रणालीत्मक, संवादात्मक आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे अपंगत्व निर्माण होते या विचाराचाही प्रसार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. अपंगत्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आणि हे अडथळे दूर करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमात आपल्या व्यावसायिक उत्पादनांचे, सेवांचा स्टॉल मांडण्यासाठी प्रति स्टॉल २५०० रुपये, तर खाद्योत्पादनांच्या स्टॉलसाठी १५,००० रुपयांचे शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ९२०९३९३४२८, इमेल आयडी- purple-fest@goa.gov.in.