गोवा खबर : गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या ‘इफ्फी टेबल टॉक्स’ या संवादात्मक चर्चासत्रात बोलताना मॅन्टो दे जेमास (हिऱ्यांचा झगा) या चित्रपटाच्या दिग्दर्शक नतालिया लोपेझ गेलार्डो म्हणाल्या, “मला हिंसक विश्वाच्या अपहरण, हत्या, मानवी तस्करी अशा सर्व रूपांचे मानसशास्त्रीय दृष्टीतून सादरीकरण करायचे होते. मेक्सिकोतील लोकांना वेदना देणाऱ्या आणि आम्हाला एकत्र आणणाऱ्या जखमा मला पडद्यावर सादर करायच्या होत्या.”
या मेक्सिकन थरारपटाचे निर्माते जोआक्वीन डेल पॅसो म्हणाले, “जेव्हा नतालिया हा चित्रपट घेऊन माझ्याकडे आली, तेव्हा ही केवळ चित्रपटांतील अनेक पात्रांपैकी इसाबेल या एका पात्राची कथा होती. जसजसा चित्रपट आकार घेऊ लागला तेव्हा नतालियाने कथेला सध्याचे स्वरूप दिले.”
‘इफ्फी टेबल टॉक्स” मध्ये चित्रपटाचे निर्माते जोआक्वीन डेल पॅसो
दिग्दर्शक नतालिया लोपेझ गेलार्डो यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाचे शीर्षक त्यांनी वाचलेल्या पुस्तकातील वाक्यप्रचारावरुन सुचले. त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे, आजकाल आपण ज्या खोल जखमा आणि शोकांतिकांचा विषय हसण्यावारी नेतो त्यांना बरे करण्यासाठी सामूहिकता आणि सौहार्दाचा वापर करणे आहे.


मॅन्टो दे जेमास (हिऱ्यांचा झगा) या चित्रपटाच्या इफ्फीमधील सादरीकरणाच्या वेळी दिग्दर्शक नतालिया लोपेझ गेलार्डो
या कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकाने विचारले की दिग्दर्शकाने जाणूनबुजून कॅमेराच्या हालचाली मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रसिध्द चित्रपट निर्मात्या म्हणाल्या की त्यांना आपण स्थितप्रज्ञ प्रेक्षक म्हणून जशा या शोकांतिका पाहू तश्या पद्धतीचे चित्रण करायचे होते.
मॅन्टो दे जेमास (हिऱ्यांचा झगा) हा चित्रपट मेक्सिकोच्या ग्रामीण भागात घडतो.वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील तीन स्त्रियाना दुर्दैवाने एका हरवलेल्या व्यक्तीच्या प्रकरणात गोवले जाते . ही हरवलेली व्यक्ती सुसंघटीत गुन्हेगारीशी संबंधित आहे आणि ही सुसंघटीत गुन्हेगारी मेक्सिकोमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसणारी स्थिती आहे.

मॅन्टो दे जेमास (हिऱ्यांचा झगा) या चित्रपटातील एक दृश्य
या चित्रपटा अत्यंत कमी प्रमाणात संवाद आहेत. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिग्दर्शक नतालिया लोपेझ गेलार्डो शेवटी म्हणाल्या की, संवाद म्हणजे चित्रपटाचे संपूर्ण सार आणि शेवट नसतो, पण तो चित्रपटाचा केवळ एक घटक असतो.