Connect with us

गोवा खबर

जीएफडीसीच्या तुये केंद्राची सुरुवात

Published

on

Spread the love
गोवा खबर: पेडणे तालुक्यात ग्रासरुट फुटबॉलच्या विकासासाठी जीएफडीसीने अजून एक पाऊल टाकताना तुये येथील डॉन बॉस्को हायस्कूल येथे गुरुवारी आपल्या फुटबॉल विकास केंद्राची सुरुवात केली. फुटबॉल क्लब तुये (एफसी तुये) व डॉन बॉस्को हायस्कूल तुये यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
६ ते १४ वर्षे वयोगटातील जवळपास ११४ मुलांनी या केंद्रात नोंदणी केली आहे.
केंद्राच्या उद्घाटनाला मांद्रेचे आमदार जित आरोलकर, जीएफडीसीचे अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर, जीएफए व एफसी तुयेचे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस, जीएफडीसीचे सदस्य शांताराम नाईक, कॉलिन वाझ, संजीव नागवेकर व प्रदीप चोडणकर, डॉन बॉस्को तुयेचे रेक्टर तसेच व्यवस्थापक फा. रिचर्ड कोर्रेया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शंखवाळकर यांनी यावेळी तुये केंद्र सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना फा. कोर्रेया यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. आयुष्यात नवी उंची गाठण्याचे स्वप्न प्रत्येक मुलाने पाहिले पाहिजे, असे त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना उद्देशून सांगितले.
उपलब्धीसाठी स्वप्न पाहणे गरजेचे आहे. स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्यात धैर्य, निर्धार व उत्साह हा गरजेचा आहे. फुटबॉल विश्‍वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. रोनाल्डो व मेस्सी हे या खेळांच्या महाकुंभात सहभागी झाले आहेत. काही दिग्गज निवृत्त झाले आहेत तर मॅराडोनासारखे काही महान खेळाडूंचे निधन झाले आहेत. या सर्वांमधील समानता म्हणजे त्यांनी कमी वयात स्वप्न पाहिले होते. त्यांना स्वतःचे वेगळेपण दाखवायचे होते, असे जीएफडीसीच्या अध्यक्षांनी सांगितले.
‘आम्ही मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. भविष्यात ते कोणती उंची गाठतील हे कोणालाच माहिती नाही. यश मिळविण्याची पहिली पायरी म्हणजे खेळाडूला ऐकण्याची इच्छा असली पाहिजे. सर्वांना उच्च स्तरावर जाणे शक्य होणार नसले तरी फुटबॉलमुळे तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवून जाणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच अन्य खेळांमध्ये फुटबॉलचा उपयोग तुम्हाला होणार आहे. फुटबॉलमध्ये चढउतार असतात. आयुष्यातही चढउतार हे असतात. तुम्ही किशोरवयीन असाल किंवा प्रौढ असला तरी आनंद व दुःख हे येतेच. कधी तुम्ही धडपडता, पडता तर कधी नेटाने उभे राहता. जेव्हा तुम्ही फुटबॉल खेळता तेव्हा प्रतिस्पर्धी तसेच सहकार्‍याचा सन्मान करणे शिका, असे ते म्हणाले.
जीएफए अध्यक्ष डॉ. फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले की, माझे जागतिक दर्जाचे फुटबॉलपटू गोव्यात घडविण्याचे स्वप्न आहे. तुये गावात जीएफडीसी केंद्र सुरू करण्याची दीर्घ कालापासून इच्छा होती. ती पूर्ण झाली. मुलांच्या व पालकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी पाठवणे गरजेचे आहे. शिक्षणापेक्षा फुटबॉलमुळे अधिक सक्षम होता येते. सध्या फुटबॉलचे व्यावसायिकरण झाले आहे. त्यामुळे यामध्ये कारकिर्द घडवणे सहज शक्य आहे. एकदिवस किमान पन्नास खेळाडू भारत व जगभरात गोव्यातून जातील, असा विश्‍वास बाळगुया, असे डॉ. फर्नांडिस म्हणाले.
आमदार आरोलकर यांनी यावेळी तुये केंद्र सुरू केल्याबद्दल आभार मानताना किनारी भागात अजून एक केंद्र सुरू करण्याची मागणी जीएफडीसीकडे केली. मुलांना या केंद्रावर पाठविण्यात सातत्य राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. पेडणे हा आकाराने विशाल तालुका आहे. मोरजी किंवा हरमल किनारी भागात अजून एक केंद्र सुरू करणे शक्य आहे. स्वतः क्रीडापटू असल्यावने खेळाचा प्रसार करण्याचे ध्येय आहे. पाच ऑलिंपिक क्रीडाप्रकार निवडून उन्हाळ्यात त्या खेळांचे शिबिर घेण्याचा विचार आहे. ग्रामपातळीवर ८ ते १४ वर्षेे वयोगटातील खेळाडूंची निवड करून कामगिरीच्या आधारे त्यांना ४ वर्षांचे प्रशिक्षण देण्याची सोय करण्याचा इरादा आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्रात हा मतदारसंघ सर्वांत सक्षम बनविण्याचे स्वप्न आहे, असे ते म्हणाले.
पालकांमध्ये खेळाबद्दल चुकीची मानसिकता आहे. त्यांना नोकरी मिळविण्यासाठी पात्र करणे एवढेच त्यांचे स्वप्न आहे. परंतु, फुटबॉलमध्ये भरपूर वाव आहे. खेळाडू क्लब, विविध खात्यांत नोकरी मिळवू शकतात. त्यांच्यावर शिकण्यास दबाव टाकू नका. त्यांना त्यांचे करियर निवडण्याची मोकळीक द्या. पालक, शिक्षक, शाळांनी या विकासात आपले योगदान दिले पाहिजे. मी एकट्याने हे करू शकत नाही. मुलांना व्यासपीठाची गरज आहे, असे ते म्हणाले.
आरोलकर यांनी जीएफए अध्यक्ष फर्नांडिस व जीएफडीसीचे मनापासून आभार मानले. डॉ. फर्नांडिस प्रत्येक भेटीवेळी फुटबॉलला नव्या उंचीवर नेण्याचे सांगत असतात. या दृष्टीने त्यांच्या पुढाकारामुळे हे केंद्र सुरू झाल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
जीएफडीसी सदस्य शांताराम नाईक म्हणाले की, या केंद्रावर पालकांनी आपल्या मुलांची नोंदणी केल्यानंतरच मुलांमधील प्रतिभा दिसून येते. मी स्वतः तुये गावचा आहे. परंतु, पणजीत वाढलो आहे. २०१२ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फुटबॉल राज्यातील प्रत्येक गावात पोहोचवण्याचे स्वप्न पाहिले होेते. त्यामुळे त्यांनी जीएफडीसीची स्थापना केली. सध्या आमची ३५ केंद्रे आहे. सरकारची मदत आम्हाला लाभत आहे. कमी वयात प्रशिक्षणार्थी जीएफडीसी केंद्रात आल्यामुळे त्यांच्या वैद्यकीय समस्या तसेच अडचणी समजून घेण्यात सोपे जात आहे, असे ते म्हणाले.
फा. कुर्रैया यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. देव हळुहळू तुये गावचा कायापालट करत आहे. मान्यवरांनी भविष्य नजरेसमोर ठेवून हे केंद्र सुरू केले आहे. आम्ही एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे.