गोवा खबर:पत्र सूचना कार्यालय आणि क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोच्या वतीने आज पणजी येथे योगोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला 39 दिवस बाकी आहेत, त्यानिमित्त जनजागृती करणे हा योगोत्सवाचा उद्देश आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालय, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, दूरदर्शन आणि आकाशवणीच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह योगोत्सवात सहभाग नोंदवला. योगगुरु सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष मंत्रालयाने निर्धारीत केलेल्या ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’नूसार या सत्राचे आयोजन केले होते. योगासन अभ्यासाची सुरुवात करताना या सुत्रांनूसारच करावी, हा यामागचा उद्देश. सुरेश कुमार स्वतः खेळाडू आणि योगप्रशिक्षक असल्यामुळे त्यांनी दैनंदिन आयुष्यात योग अभ्यासाचे महत्त्व विशद केले.

पत्र सूचना कार्यालय, भारतीय योग विद्येविषयी मुद्रीत, डिजीटल, समाजमाध्यमांतून नियमितपणे प्रसार आणि प्रचार करत आहे. यावर्षीच्या योग दिनासाठी पर्यावरणपूरक अशा मूरहेन योग चटया वापरण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन, 2022 संबंधी सर्वसामान्य योग अभ्यास आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या https://yoga.ayush.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्या.
पसूकाचे सहसंचालक डी वी विनोदकुमार यांनी योगोत्सवाचे प्रास्ताविक केले तर क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियाज बाबू यांनी संचलन आणि आभारप्रदर्शन केले.