Connect with us

गोवा खबर

आयसीएआरने आयोजित केलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाची सांगता

Published

on

Spread the love

गोवा खबर:सागरी किनारी राज्यांमधील संशोधन संस्थांनी पशुधन आणि फळबागायतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्लीचे उपमहासंचालक डॉ सुरेश कुमार चौधरी यांनी केले. आयसीएआर-सीसीएआरआयकडून आयोजित तीन दिवसीय परिसंवादाच्या समारोप सत्राला त्यांनी आज संबोधित केले. 11, 12 आणि 13 मे असे तीन राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

11 मे रोजी केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी परिसंवादाचे उद्घाटन केले. तसेच याप्रसंगी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतलेल्या पद्मश्री अमई महालिंग नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तीन दिवसात सात कृषी शास्त्रज्ञांनी किनारी राज्यांना कृषी स्वावलंबनासाठी काय उपाययोजना करता येईल या विषयावर संशोधन पेपर सादर केले.

परिषदेत सागरी संपत्ती अर्थात मच्छीमारीबरोबरच फळलागवड, फुले लागवड, भाजीपाला आणि फळ प्रक्रिया याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता यावर भर देण्यात आला. काही राज्यातून फुले युरोपात निर्यात होतात. अतिशय कमी खर्चात यामुळे चांगला आर्थिक लाभ होतो, त्यामुळे किनारी राज्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा याकडे लक्ष द्यावे, असे आयसीएआर दिल्लीचे उपमहासंचालक डॉ चौधरी म्हणाले.

युवा शास्त्रज्ञांनी आपल्याकडे असलेल्या माहितीचा उपयोग करुन तंत्रज्ञानाचा वापर करुन किनारी राज्यांना स्वावलंबी कसे बनवता येईल, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. परिसंवादात प्रत्यक्षरित्या 160 आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 100 संशोधक, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांनी उपस्थिती लावली.

याप्रसंगी डॉ चौधरी यांच्या आयसीएआर प्रांगणात कृषी स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘अग्नी’ या इन्क्युबेशन सेंटरचे आणि कृषी-पर्यटन या संकल्पनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या अतिथी गृहाचेही उद्घाटन केले.