Connect with us

गोवा खबर

भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड असतील पर्पल फेस्ट २०२३मध्ये प्रमुख वक्ते

Published

on

Spread the love
पर्पल फेस्ट: गोव्यात ६ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान रंगणार वैविध्यतेचा सोहळा
गोवा खबर: भारताचे  सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड हे पर्पल फेस्ट २०२३ मध्ये प्रमुख वक्ते म्हणून हजर राहातील.वैविध्यतेचा सोहळा म्हणून लोकप्रिय असलेला पर्पल फेस्ट २०२३ हा महोत्सव गोव्यामध्ये ६ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान होणार असून गोवा दिव्यांगजन  राज्य आयुक्त, गोवा राज्य समाज कल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या  सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.
या तीन दिवसीय महोत्सवादरम्यान गोवा मनोरंजन संस्थेचे संकुल, माकिनेज पॅलेस, आयनॉक्स पणजी, मनोहर पर्रीकर इन्डोअर स्टेडियम-काम्पाल, संजय विशेष स्कूल-पर्वरी, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम- बांबोळी, गेरा स्कूल-जुने गोवे, धारबांदोडा, फोंडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन होणार आहे.
“गोवा राज्य एका राष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. गोवा दिव्यांग राज्य आयुक्त आणि गोवा राज्य समाज कल्याण संचालनालय यांच्याद्वारे हा महोत्सव यशस्वी व संस्मरणीय ठरण्यासाठी व्यापक नियोजन व मेहनत केली जात आहे,” अशी माहिती गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी दिली.
“या ऐतिहासिक ठरेल अशा पहिल्या उपक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून भारताचे सरन्यायाधीश सन्माननीय डॉ. डी. वाय. चंद्रचूड हे बीजभाषण करणार आहेत. या उपक्रमास ४०००हून अधिक प्रतिनिधींनी नावनोंदणी केली असून गोव्यामध्ये हा वार्षिक उपक्रम ठरेल,” अशी अपेक्षा गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर यांनी व्यक्त केली.
“या महोत्सवाची रचना ही विविध क्षेत्रांचा विचार करून करण्यात आली आहे. यामध्ये चांगली बाब म्हणजे २१ दिव्यांगता प्रकारांसाठीचे दूत याबाबत जागरुकता घडवणार असून ते सर्वांसाठी प्रेरणादायक ठरणार आहेत,” अशी माहिती गोवा  राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव श्री. ताहा हाझिक यांनी दिली. श्री. ताहा पुढे म्हणाले, “आणखी एका चांगल्या कारणासाठी गोवा हे प्रमुख आकर्षण स्थळ ठरणार आहे. आम्ही अनेक बाबतीत अग्रणी आहोत आणि एक सर्वसमावेशक समाज विकसित करून प्रत्येक व्यक्तीमधील वेगळेपण लक्षात घेऊन त्याचा मानसन्मान, आदर राखू.”
पर्पल फेस्ट महोत्सवदरम्यान विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन होणार आहे. माकिनेझ पॅलेस येथे ४ ते ६ जानेवारी दरम्यान दृषटीबाधित व बधीर व्यक्तींसाठीचे संमेलन होणार आहे. ८ जानेवारी रोजी जुने गोवे येथील गेरा स्कूलमध्ये १०वी मिस्टर अँड मिस डॅफ इंडिया-२०२३ स्पर्धा रंगणार आहे. तर संजय स्कूल-पर्वरी येथे ५ व ६ जानेवारी रोजी अॅक्सेस इंडिया(सुगम्य भारत) संमेलन भरणार आहे. माकिनेझ पॅलेस-पणजी येथे ८ जानेवारी ‘रीच टु अनरिच्ड’ हा उपक्रम होणार आहे. पर्पल फेस्टमध्ये शंकर महादेव यांच्या समवेत गोव्यातील ६० दिव्यांग विद्यार्थी आपली कला पेश करणार आहेत. सध्या या विद्यार्थ्यांना शंकर महादेवन अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
या महोत्सवामध्ये होणारे दिव्यांग व्यक्तींसाठीचे विविध क्रीडा उपक्रमही आकर्षण ठरणार आहेत. ५ ते ७ जानेवारी दरम्यान पणजी जिमखाना तसेच धारबांदोडा मैदानावर आंतरराज्य दृष्टीबाधित क्रिकेट सामने होणार आहेत. ६ व ७ जानेवारी रोजी काम्पाल येथे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर अखिल भारतीय पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशीप
रंगणार आहे. तर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानावर ८ जानेवारी रोजी पर्पल ।-रन गोवा मॅराथॉन होणार आहे.
तसेच दिव्यांगजनां समवेत अधिकाधिक वेळ घालवता यावा, त्यांच्याशी संवाद साधता यावा, त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेता यावी आणि एकमेकांचे अनुभव शेअर करत जीवनातील आनंदाला नवी झालर लावावी यासाठी खास ‘पर्पल झोन’ विकसित करण्यात आले आहेत. माकिनेझ पॅलेसमध्ये होणाऱ्या पर्पल थिंक टँक उपक्रमामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण, रोजगार, क्रीडा संधींबाबत विविध क्षेत्रांतील ६०हून अधिक वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
अंतर्चक्षू, जागृती मेळा, इन्क्लुझिव कार्निवल आदी उपक्रम जुने गोमेकॉ इमारत आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या कोर्टयार्डमध्ये उभारलेल्या पर्पल एक्स्पिरियन्स् झोनमध्ये होणार आहेत. दिव्यांगासह जीवनाची नेमकी  दिशा पकडण्याचा अनुभव प्रतिबिंबित करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम विकसित करण्यात आले आहेत.
तसेच दिव्यागजनाना सक्षम करण्यासाठी विकसित विविध साहित्य, साधने, उपकरणे यांचे प्रदर्शन पर्पल एक्झिबिशनमध्ये होणार आहे. दिव्यांग व्यक्तींनी बनवलेली विविध उत्पादने या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल. केवळ पर्पल फेस्ट उपक्रमादरम्यानच नाही तर जीवनात नेहमीच आपण सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचा विश्वास दिव्यांग व्यक्तींना वाटला पाहिजे, अशी अपेक्षाही समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केली.
६ ते ८ जानेवारी दरम्यान ईएसजी कोर्डयार्डवर पर्पल रेन उपक्रम होणार आहे. तर ईएसजी-पणजी, करमळी, मिरामार आदी ठिकाणी पर्पल फन उपक्रमादरम्यान विविध मनोरंजन कार्यक्रमही रंगणार आहेत. यामध्ये दृष्टीबाधितांच्या सहाय्याने कार रॅली,  करमळी तळ्याभोवती बर्ड वॉक, पणजी शहर परिसरात पणजी दर्शन, चित्रपटांचे प्रदर्शन तसेच मिरमार किनाऱ्यावर मनोरंजन व क्रूझ राइड आदी उपक्रमांचा समावेश आहे.