Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यातील मोपा इथे, ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

Published

on

Spread the love


“हे अत्याधुनिक विमानतळ टर्मिनल म्हणजे, गोव्याच्या जनतेनं दिलेलं प्रेम आणि आशीर्वादांची परतफेड करण्याचा छोटासा प्रयत्न आहे.”

“मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून, पर्रिकर जी याचं प्रवाशांना कायम स्मरण होत राहील.”

“याआधी ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा विकासाची आत्यंतिक गरज होती, त्या भागांकडे दुर्लक्ष केले गेले.”

“देशांत, आधीच्या 70 वर्षांत, 70 विमानतळ विकसित झाले, त्या तुलनेत, गेल्या आठ वर्षांत देशांत 72 नवीन विमानतळ विकसित झाले.”

“भारत आज हवाई वाहतूक व्यवसायाची जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ ठरला आहे.”

“21 व्या शतकातील भारत हा नवा भारत आहे, जो जागतिक मंचांवर  आपला ठसा उमटवतो आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून, जगाचा भारताविषयीचा दृष्टिकोन झपाट्याने बदलतो आहे.”

“प्रवास सुलभता वाढावी, आणि देशाच्या पर्यटन व्यवसायात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले गेले आहेत”

“आज गोवा राज्य, सर्वच क्षेत्रात 100 टक्के यश गाठणाऱ्या राज्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.”

 गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाची पायाभरणी देखील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच, नोव्हेंबर 2016 मध्ये केली होती. सुमारे, 2870 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेला हा विमानतळ, शाश्वत पायाभूत सुविधा या संकल्पनेवर आधारित आहे. यात, सौरऊर्जा प्रकल्प, हरित इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र- ज्यात पुनर्प्रक्रिया सुविधाही आहे, अशा सगळ्या सुविधा यात देण्यात आल्या आहेत. सुरुवातीला, विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात, प्रतिवर्ष 4.4 दशलक्ष प्रवासी क्षमता असेल. त्यानंतर याचा 33 दक्षलक्ष प्रवाशांपर्यंत विस्तार करता येईल.

यावेळी बोलतांना, पंतप्रधानांनी प्रथम,मोपा इथे सुरु झालेल्या या ग्रीनफील्ड विमानतळाबद्दल  गोव्याच्या नागरिकांचे अभिनंदन केले. गेल्या आठ वर्षात गोव्याला दिलेल्या भेटींचे स्मरण करत पंतप्रधानांनी, गोव्याच्या नागरिकांनी त्यांच्यावर दाखवलेले प्रेम आणि स्नेहाचा उल्लेख केला. गोव्याचा विकास करुन, या प्रेमाची परतफेड करु, असं पंतप्रधान म्हणाले. “हे विमानतळ म्हणजे, गोव्याच्या जनतेने केलेलं प्रेम आणि आशीर्वाद यांची परतफेड करण्याचा प्रयत्न आहे.” असे ते म्हणाले. या विमानतळाला, गोव्याचे सुपुत्र, दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

गेल्या काळातील, सरकारांच्या पायाभूत सुविधा विकासाबद्दलच्या दृष्टिकोनावर त्यांनी टीका केली. जनतेच्या गरजा आणि आवश्यकता, यापेक्षा, त्यावेळी, मतपेढीच्या राजकारणाला अधिक महत्त्व दिले जात आहे. असे अनेक प्रकल्प देशांत झाले, ज्यांची काहीही गरज नसतांनाही त्यांच्यावर हजारो कोटी रुपये खर्च केले गेले, असेही त्यांनी सांगितले. त्याचा परिणाम म्हणून,जिथे पायाभूत सुविधा होण्याची नितांत गरज होती, असे प्रदेश मात्र दुर्लक्षित राहिले.

“गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे याचे स्पष्ट उदाहरण आहे.” असे ते म्हणाले.

अटल बिहारी वाजपेयी, यांच्या कार्यकाळातच, या विमानतळाची संकल्पना मांडण्यात आली होती, असे सांगत, त्यांचे सरकार सत्तेतून गेल्यावर, हा प्रकल्प अनेक वर्षे, धूळ खात पडून राहिला, असा खेद पंतप्रधानांनी व्यक्त केला. 2014 साली, जेव्हा, दुहेरी इंजिनाचे सरकार, सत्तेवर आले, तेव्हा या विमानतळाच्या प्रकल्पाला गती मिळाली.  त्यांच्याच हस्ते सहा वर्षांपूर्वी, या विमानतळाची पायाभरणी झाली. त्यानंतर अनेक कायदेशीर अडचणी आणि कोविड महामारीचे संकट येऊनही, हा विमानतळ पूर्ण होऊन आज कार्यान्वित होत आहे, असे त्यांनी सांगितले. या विमानतळाची प्रवासी क्षमता सध्या, प्रतिवर्ष 40 लाख प्रवासी इतकी असली, तरी ती भविष्यात, साडेतीन कोटींपर्यंत वाढवता येऊ शकेल. पर्यटनासोबतच, दोन विमानतळांमुळे, गोव्यात मालवाहतुकीचे केंद्र बनण्यासाठीची संधीही निर्माण झाली आहे, असं ते म्हणाले.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बदललेल्या प्रशासकीय कार्यशैलीचा आणि दृष्टिकोनाचा पुरावा असल्याचं पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिलं.  ते म्हणाले की 2014 पूर्वी, विमान प्रवास हा उच्चभ्रू लोकांच्या प्रतिष्ठेचा विषय होता.  सामान्य नागरिकांनाही हवाई प्रवास करता यावा या विचाराकडेच यामुळे दुर्लक्ष झाल्यानं,  विमानतळ आणि विमान प्रवासाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांमध्ये  गुंतवणूक कमीच झाली आणि प्रचंड क्षमता असूनही भारत हवाई प्रवासात मागे पडला.  पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 70 वर्षांत देशातील विमानतळांची संख्या फक्त 70 होती आणि विमान प्रवास मोठ्या शहरांपुरता मर्यादित होता.  सरकारनं 2 स्तरांवर काम केलं, असं सांगत पंतप्रधान पुढे म्हणाले की प्रथम, विमानतळांचं जाळं देशभर विस्तारलं आणि  दुसरं, सामान्य नागरिकांना उडान योजनेद्वारे विमान प्रवासाची संधी मिळाली. या आधीच्या 70 वर्षांमधील 70 विमानतळांच्या तुलनेत गेल्या 8 वर्षांत 72 विमानतळ उभारले गेले आहेत.  याचाच अर्थ देशात विमानतळांची संख्या दुपटीनं वाढली आहे.  शिवाय, 2000 मध्ये असलेल्या फक्त 6 कोटी प्रवाशांच्या तुलनेत 2020 मध्ये (कोरोनासाथीच्या  अगदी आधी) हवाई प्रवाशांची संख्या 14 कोटींहून अधिक झाली. उडान योजने अंतर्गत 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केला.  “या उपायांमुळे, भारत विमान वाहतुकीची जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे”, असं ते म्हणाले.

पर्यटनामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराची सर्वाधिक  क्षमता आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि गोव्यामधील  पर्यटन संबंधी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. ” 2014 पासून राज्यातील महामार्ग प्रकल्पांमध्ये 10 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. गोव्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही  लक्ष दिले जात आहे. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचाही राज्याला लाभ  होत आहे,” असे ते म्हणाले.

कनेक्टिव्हिटी वाढवण्याबरोबरच, स्मारकांची देखभाल, कनेक्टिव्हिटी आणि संबंधित सुविधा सुधारून वारसा  पर्यटनाला चालना देण्यावरही सरकारचा भर आहे असे पंतप्रधान म्हणाले . या प्रयत्नाचे उदाहरण म्हणून अगोडा कारागृह संकुलातील  संग्रहालयाच्या विकासाचा मोदी यांनी उल्लेख केला. स्मारके अधिक आकर्षक बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे तसेच  तीर्थक्षेत्रे आणि स्मारकांना भेट देण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा पुरवली जात आहे असे ते म्हणाले.

भौतिक पायाभूत सुविधांइतकेच सामाजिक पायाभूत सुविधांनाही महत्त्व देण्याच्या  गोवा सरकारच्या प्रयत्नांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. स्वयंपूर्ण गोवा अभियानाच्या यशाचे पंतप्रधानांनी कौतुक केले . जगणे सुखकर बनवण्याला प्रोत्साहन  आणि सरकारी योजनांपासून एकही  नागरिक वंचित राहणार नाही हे या अभियानाने सुनिश्चित केले.  “आज, गोवा हे  सरकारी योजना 100% जनतेपर्यंत पोहचवणाऱ्या  मॉडेलचे योग्य उदाहरण बनले आहे” असे  पंतप्रधानांनी सांगितले. राज्यात सुरु असलेली विकास कामे पुढे नेण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रोत्साहित केले.

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे राज्यपाल  पी एस श्रीधरन पिल्लई, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य  सिंधिया आणि केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री श्रीपाद येसो नाईक हे उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

देशभरात जागतिक दर्जाच्या पायाभूत तसेच वाहतुकीच्या सुविधा उभारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा नेहमीच प्रयत्न असतो.  याच दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधानांनी  गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विमानतळासाठी पायाभरणी केली होती.

सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला आहे आणि त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. या विमानतळाच्या बांधकामात  3-डी  मोनोलिथिक प्रीकास्ट इमारत, स्टॅबिलरोड , रोबोमॅटिक हॉलो प्रीकास्ट भिंती, 5 जी तंत्रज्ञानाशी अनुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा सारख्या  सर्वोत्तम दर्जाच्या विशेष तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. विमानतळाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या विमानांच्या हाताळणीची  क्षमता असलेली  धावपट्टी, रात्रीच्या वेळी विमाने उभी करून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थेसह 14 पार्किंग बे , सेल्फ-बॅगेज ड्रॉप सुविधा, अत्याधुनिक आणि स्वतंत्र  हवाई दिशादर्शन सुविधा आदींचा यात  समावेश आहे.

सुरुवातीला, पहिल्या टप्प्यात या विमानतळावर दर वर्षी अंदाजे 4.4 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकतील आणि यात टप्प्याटप्प्याने वाढ होऊन  त्याचा विस्तार  वार्षिक  33 दशलक्ष प्रवासी  क्षमतेपर्यंत केला जाईल.  या विमानतळामुळे गोवा राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि तिथल्या  पर्यटन उद्योगाच्या गरजा पूर्ण होतील. अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी थेट जोडले गेल्यामुळे अत्यंत महत्त्वाचे लॉजिस्टिक हब म्हणून बनण्याची या विमानतळाची  क्षमता आहे. या विमानतळावर बहुविध संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्याचे देखील नियोजन  आहे.

जागतिक दर्जाचे विमानतळ असूनही हे विमानतळ प्रवाशांना गोव्याची अनुभूती आणि अनुभव  देईल. या विमानतळाच्या बांधकामात मूळच्या  गोव्याच्या  अझुलेजोस टाईल्सचा वापर करण्यात आला आहे. येथील फूड कोर्टमध्ये गोव्याचे खास वैशिष्ट्य असलेल्या कॅफेची मजा अनुभवता येईल. या विमानतळावर क्युरेटेड स्वस्त बाजारपेठेसाठी विशेष जागा ठेवण्यात आली आहे जिथे स्थानिक कारागीर आणि हस्तकलाकार त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शित करू शकतील आणि त्यांची विक्री देखील करू शकतील.