गोवा खबर : विकासाच्या संदिग्ध शक्तींनी त्याला धमकावण्यासाठी त्यांचे हिंसक आणि जबरदस्तीचे डावपेच वापरले , तेव्हाही त्याच्या आजूबाजूचे लोक हतबल झाले, मात्र तरीही डोमिंगोने धीर सोडला नाही. त्याची स्वतःची जमीन, पृथ्वीचा तो तुकडा ज्यावर त्याला आपला पृथ्वीतलावरील प्रवास करायचा होता, तो अधिकार हातातून सोडू न देण्याच्या आपल्या निश्चयाबाबत तो ठाम होता.

‘डोमिंगो अँड द मिस्ट’ हा अशा प्रकारे एका माणसाच्या त्याचा भूतकाळ आणि त्याची जमीन ताब्यात ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षाचा एक गंभीर आणि चिंतनशील विचार आहे; हा चित्रपट विकासाच्या अनुषंगाने जमिनीचा वाद आणि संघर्षांचा शोध घेतो.

गोवा इथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग म्हणून आज आयोजित इफ्फी टेबल टॉक्स सत्रात प्रसारमाध्यमांशी आणि महोत्सवाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना, दिग्दर्शक एरियल एस्कॅलेंट मेझा म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांना त्यांची जमीन वाचवण्यासाठी काय किंमत चुकवण्यास भाग पाडले जाते हे दाखवण्याच्या गरजेतून या चित्रपटाचे बीज पेरले गेले.
स्पॅनिश भाषेत बनलेल्या कोस्टा रिकाच्या चित्रपटाचा इफ्फी 53 मध्ये ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड ‘ श्रेणी अंतर्गत भारतीय प्रीमियर झाला. या चित्रपटाचा या वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झाला आणि 95 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी कोस्टा रिकाचा सिनेमा म्हणूनही त्याची निवड झाली.हा चित्रपट कोस्टा रिका आणि कतार देशाची सहनिर्मिती आहे.

दिग्दर्शक एरियल एस्कॅलेंट मेझा यांनी डी कोस्टा रिका युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्रात आणि क्युबामधील एस्क्यूएला इंटरनॅशनल डी सिने वाय टेलिव्हिजन (ईआयसीटीव्ही) आणि कॅनडातील मॉन्ट्रियल येथील कॉनकॉर्डिया युनिव्हर्सिटीमधून सिनेमात पदवी प्राप्त केली. त्याचा पहिला चित्रपट द साउंड ऑफ थिंग्ज (2016) हा 2018 मध्ये कोस्टा रिकाकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.