Connect with us

गोवा खबर

उझबेकिस्तानने भारतीय चित्रपट निर्मात्यांना मध्य आशियायी प्रजासत्ताकात चित्रिकरणासाठी दिले निमंत्रण

Published

on

Spread the love

गोवा खबर : आमच्या देशात चित्रपट निर्मिती करण्याकरता भारतीय चित्रपट निर्मात्यांसोबत सहकार्य करण्यासाठी उझबेकिस्तान उत्सुक आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी या क्षेत्रातील संबंधितांचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करण्यासाठी मध्य आशियायी प्रजासत्ताक उत्सुक आहे. होय, भारतीय चित्रपटनिर्मात्यांना, आमच्या देशामधील मशिदी, स्मृतिस्थळे आणि इतर स्थानांसह विविध आकर्षक वास्तुरचना, धार्मिक आणि नैसर्गिक स्थानांचा चित्रिकरणासाठी वापर करून आपल्या चित्रपटांचा आवाका, खोली आणि समृद्ध अनुभवात आणखी भर घालावी यासाठी अतिशय आग्रहाचे निमंत्रण मिळाले आहे.

उझबेकिस्तानच्या सिनेमॅटोग्राफी संस्थेच्या महासंचालकांच्या सल्लागार डॉ. बार्नो उन्गबोएवा यांनी गोव्यामध्ये सुरू असलेल्या 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आयोजित इफ्फी टेबल टॉक्स दरम्यान भारतीय चित्रपटनिर्मात्यांना हे निमंत्रण दिले. यावेळी त्यांच्यासोबत उझबेकिस्तानचे चित्रपट दिग्दर्शक खिलाल नसिमोव्ह आणि लझीझ तेमिरोव्ह आणि निर्माते अताबेक खोदजिएव्ह उपस्थित होते.

“ताश्कंद चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आलेले बॉलिवुड चित्रपट आमच्याकडे आहेत. आम्ही तमिळ, तेलुगु आणि बंगाली चित्रपट उद्योगांसारख्या इतर भारतीय चित्रपट उद्योगांनाही आमच्याकडे येण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला आहे,” असे बार्नो उन्गबोएवा म्हणाल्या.

पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांना आम्ही ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच दिवसांच्या चित्रपट निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंधाना यांना यापुढे होणाऱ्या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचे निमंत्रण दिले आहे आणि त्यांनी त्याबाबत सहमती दर्शवली आहे, असे त्यांनी सांगितले.

बॉलिवुड चित्रपट आणि हिंदी चित्रपटगीते आमच्या देशात अतिशय लोकप्रिय आहेत, अशी माहिती उझबेकी दिग्दर्शक खिलाल नसिमोव्ह यांनी दिली. भारतीय संगीत ऐकत आणि राज कपूर, हेमा मालिनी, शाहरुख खान आणि इतर कलाकारांचे भारतीय चित्रपट पाहात आम्ही लहानाचे मोठे झालो. आम्हाला ते खूप आवडतात. आमच्या आयुष्यात आमच्या भावनांना आणखी उत्कट करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे नसिमोव्ह म्हणाले.

निर्माते अताबेक खोदजिएव्ह यांनी भारतीय चित्रपट निर्मात्यांना उझबेकिस्तान फिल्म इन्स्टिट्युटला भेट देण्याचे आणि त्यांच्या देशात चित्रिकरणासाठी सहकार्य घेण्याचे आवाहन केले. “भारत- उझबेकिस्तान मैत्री सदैव बळकट राहावी अशी आमची इच्छा आहे.”

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर यांच्या नेतृत्वाखालील भारताचे चित्रपट शिष्टमंडळ यावर्षी झालेल्या 14व्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थित होते. त्यावेळी उझबेकिस्तानसोबत सहकार्य आणि सहनिर्मितीविषयक नव्या पावलांसाठी करार करण्यात आले.

Continue Reading