Connect with us

गोवा खबर

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वांखालील भाजप सरकारचे गोव्यात “रम राज्य”:अमरनाथ पणजीकर

Published

on

Spread the love
गोवा खबर : भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात  “राम राज्य” नव्हे ” रम राज्य” सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा भेटीदरम्यान पुष्पचक्र अर्पण केलेल्या राजधानी पणजीतील आझाद मैदानाचा वापर आज दारूडे करू लागले आहेत. भाजप सरकार स्वातंत्र्यसैनीकांचा अशा प्रकारे अपमान करीत आहे असा गंभिर आरोप काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला.
पणजीच्या आझाद मैदानात बसून दिवसाढवळ्या खुलेआम दारू पिण्याऱ्यांचा एक  व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारच्या बेगडी हिंदुत्व आणि बनावट देशभक्तीची खिल्ली उडवली आहे.
गोव्यात मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करून राम रथाचे नाव दिलेल्या वाहनाला गोव्याच्या रस्त्यावर फिरण्यास परवानगी दिल्याबद्दल आम्ही अगदी आठवड्याभरापूर्वी मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो आणि इतर भाजप नेत्यांचा पर्दाफाश केला होता . मडगाव येथे केवळ फोटो काढण्याच्या हव्यासापोटी काही मंत्री, आमदार आणि इतर नेत्यांनी भगवान हनुमानाकडे पाठ फिरवली होती हे आम्ही पुराव्यासह उघड केले होते, असे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले. भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी हिंदू धर्म आणि संस्कृतीचा अशा प्रकारे अपमान करत आहे, असे ते म्हणाले.
राज्य पोलीस मुख्यालयाच्या अगदी समोर असलेले आझाद मैदान जेथे हुतात्मा स्मारक, डॉ. टी.बी.कुन्हा स्मारक आहे ते आता मद्यपी आणि जुगाऱ्यांचा अड्डा बनले आहे, हे धक्कादायक आहे. भाजप सरकारला स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदर नसल्याचा आणि सरकारचे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचा हा पुरावा आहे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.
पवित्र आझाद मैदानावर मद्यपींना मोकळीक देऊन लोकांच्या भावनांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांची आणि गोव्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी वेळोवेळी हिंदुत्वाचा व देशभक्तीचा वापर करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा गोमंतकीयांनी ओळखणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात भाजप हिंदुत्वविरोधी आणि देशद्रोही आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.