Connect with us

गोवा खबर

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत देशासाठी वीरगती प्राप्त जवानांचे पंतप्रधानांच्या स्वाक्षरी असलेल्या विशेष मानचिन्ह रुपाने स्मरण

Published

on

Spread the love

गोव्यातील रामचंद्र शिंदे आणि तुकाराम गवस या शहीद जवानांच्या कुटुंबियांना गोवा एनसीसी बटालियनकडून मानचिन्ह प्रदान

 

 गोवा खबर:गोव्यातील शहीद जवान रामचंद्र शिंदे आणि तुकाराम गवस यांना 1 गोवा एनसीसी बटालियनकडून पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेले विशेष मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 1 गोवा एनसीसी बटालियनचे कर्नल बी एस चरक आणि सुभेदार मेजर नरेंद्र दत्त यांनी जवानांच्या कुटुंबियांना मानचिन्ह सुपूर्द केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत शहीद जवानांप्रती कृतज्ञता म्हणून हे विशेष मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

 “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन वीर जवानांप्रतीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे कर्नल बी एस चरक यांनी सांगितले.

कुचेली (म्हापसा) येथील वीर जवान रामचंद्र शिंदे यांच्या वीरमाता श्रीमती ताराबाई शिंदे यांनी विशेष मानचिन्ह स्वीकारले.

वीर जवान रामचंद्र शिंदे 2002 साली भारतीय सैन्यात रुजु झाले होते. 12 ऑक्टोबर 2006 रोजी काश्मीरमधील शोपियान येथे कर्तव्यावर असताना दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

रामचंद्र शिंदे यांच्या शौर्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या भाऊही सैन्यात रुजू झाल्याचे वीरमाता ताराबाई शिंदे म्हणाल्या.

दुसऱ्या एका कार्यक्रमात चांदेल (पेडणे) येथील वीर जवान तुकाराम गवस यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे विशेष मानचिन्ह प्रदान करण्यात आले. वीर जवान तुकाराम गवस यांना 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात बारमेर, राजस्थान येथे पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढताना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी लिलावती तुकाराम गवस यांनी कुटुंबियांची काळजी घेतली.

वीर जवानांबद्दल माहिती

शिपाई तुकाराम गवस (चांदेल, म्हापसा) 

तुकाराम गवस 4 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कर्तव्यावर होते. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी सैन्याचा सामना करताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पश्चात सध्या 78 वर्ष वय असलेल्या लिलावती तुकाराम गवस यांनी मोठ्या धैर्याने कुटुंबियांचा सांभाळ केला.

शिपाई शिंदे रामचंद्र शिवाजी (कुचेली, म्हापसा)  

वीर जवान रामचंद्र शिंदे यांचा जन्म 28 जून 1981 रोजी झाला. ते 25 जानेवारी 2002 रोजी सैन्यदलात रुजु झाले. 44 राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये कार्यरत असताना 12 ऑक्टोबर 2006 रोजी शोपियान (काश्मीर) येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी वीरगती प्राप्त झाली.