Connect with us

गोवा खबर

पेडण्यात गणेश मूर्ती कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयात नवचेतना युवक संघ पेडणे आणि इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. भारतीय संस्कृतीतील उपासना आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वाच्या घटकांना जोडणारी गणेश मूर्ती कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शैक्षणिक उपक्रम नव्हे, तर अनुभवाचे विद्यापीठ ठरली. विद्यार्थ्यांनी परंपरेला आधुनिक जाणिवांची जोड देत मातीच्या मूर्ती बनवून एक पर्यावरणनिष्ठतेचा संदेश दिला.

या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले पेडणे तालुक्यातील युवा मूर्तीकार उमाकांत पोके यांचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन. उमाकांत यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष मूर्ती घडवून दाखवत मूर्तिकलेची बारकावे समजावून सांगितली. त्यांच्या हातातील माती जणू सजीव झाली आणि विद्यार्थ्यांचेही हात त्या सर्जनप्रक्रियेत सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी साच्यांच्या साहाय्याने स्वतःहून विविध आकाराच्या गणेशमूर्ती तयार केल्या. केवळ कृती नव्हे तर श्रद्धेचे मूर्त रूप त्यांनी त्या मातीमध्ये साकारले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, संपूर्ण कार्यशाळा प्रेरणादायी वातावरणात पार पडली. मातीच्या सुगंधात, हातात पाण्याच्या थेंबात, आणि मनात भक्तीच्या नादात ही कार्यशाळा घडली. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच वेळ होती ज्या वेळी त्यांनी स्वतःहून मूर्ती तयार केली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान त्यांच्या अनुभवांची साक्ष देत होता.

या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ज्येष्ठ चित्रकार पी.ए सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जुआव कोस्ता, इतिहास विभाग प्रमुख प्रा. झेवियर मार्टिन्स, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, प्रशिक्षक उमाकांत पोके, डॉ. रोहित फळगावकर, कांता जाधव उपस्थित होते.

संस्कृतीचे संवेदनशील वारसदार बना : कृष्णा पालयेकर 

या कार्यशाळेत कृष्णा पालयेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, माती ही आपली संस्कृती आहे, आणि तिच्यातून साकारलेली मूर्ती ही आपल्या भावनांची अभिव्यक्ती. मूर्ती बनवताना आपण केवळ एक शिल्प साकारत नाही, तर आपले मूल्य, आपली जाणीव आणि पर्यावरणाची जबाबदारी यांचे रूप तयार करतो. आजच्या तरुण पिढीने श्रद्धेच्या आड निसर्गाचा विध्वंस न करता, त्याच्याशी जपून आणि प्रेमाने वागायला हवे असे सांगून त्यांनी पर्यावरणपूरक उत्सवाच्या गरजांवर आणि त्यासाठी युवा सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जुआव कोस्ता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजच्या शिक्षणपद्धतीला कृतीशीलतेची जोड आवश्यक आहे. या कार्यशाळेद्वारे नवचेतना युवक संघाने दाखवून दिले की सामाजिक जबाबदाऱ्या आणि सृजनशीलता एकत्रितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतात. पर्यावरणपुरक मूर्तींच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन आणि पर्यावरणाचा सन्मान अशा दुहेरी उद्दिष्टांची पूर्ती ही कार्यशाळा करत आहे. नवचेतना युवक संघाचे कार्य निश्चितच अनुकरणीय आहे.

मातीच्या मूर्तींतून साकारलेले मूल्यशिक्षण : डॉ. रोहित फळगावकर

डॉ. रोहित फळगावकर म्हणाले, ही कार्यशाळा केवळ कलासंवर्धनाचे साधन ठरली नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणीय जाणीव आणि परंपरेची नाळ जागवणारा एक अनुभव बनली. हातांनी घडवलेल्या मातीच्या मूर्तींनी त्यांच्या मनात मूल्यांचे बीज रोवले. भविष्यातही अशा कृतीशील, पर्यावरणस्नेही आणि संस्कृतीप्रेमी उपक्रमांची गरज आहे आणि नवचेतना युवक संघासारखे संघटन हे कार्य अविरतपणे करीत राहतील. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच आपले हात मातीत घालून गणेश मूर्ती तयार करण्याचा अविस्मरणीय क्षण अनुभवला व ही कार्यशाळा यशस्वी झाली.