Published
4 years agoon
आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात. अगदी त्रेतायुगापासून हिंदु लोक विजयादशमी महोत्सव साजरा करत आलेले आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. दसर्याला सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात. तसेच या दिवशी सरस्वती पूजनही केले जाते. या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता याविषयीचा इतिहास, महत्त्व तसेच हा सण साजरा करण्याची पद्धत या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव केला. कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजनांनी नेले. त्या काळापासून, म्हणजेच त्रेतायुगापासून हिंदु लोक विजयादशमी महोत्सव साजरा करत आहेत.
प्रभु श्रीराम याने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले आहे.
पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.
दसर्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.
हा सण एक कृषीविषयक लोकोत्सव म्हणूनही साजरा होत असे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.
शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका । धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ।।
करिष्यमाणयात्रायां यथाकाल सुखं मया । तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ।।
अर्थ : शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय असून अर्जुनाच्या बाणांना धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण । इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.
आपट्याची पाने सोने म्हणून देणे : शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे. आपट्याची पाने तेजतत्त्वाच्या लहरींनी युक्त असतात. आपट्याची पाने स्वीकारणाऱ्याला दसऱ्याच्या दिवशी जास्त प्रमाणात कार्यरत असलेले श्रीरामतत्त्व आणि मारुतितत्त्व यांचा सहज लाभ होतो. दसर्याला श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक, म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास साहाय्य होते.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला । अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.
शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन : या दिवशी राजे, सामंत आणि सरदार हे वीर आपापली उपकरणे आणि शस्त्रांचे पूजन करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.
सहकार धोरण २०२६ जाहीर; १५ महिन्यांत थकीत कर्जाचे प्रमाण घटले
मांडवी आणि जुवारी नदीकाठची ६.७२ कोटी चौ.मी. जमीन ‘इको सेन्सिटिव्ह’ घोषित
पर्वरी उड्डाणपूल चतुर्थीपूर्वी खुला होणार; सार्वजनिक बांधकाममंत्री कामत यांची घोषणा
दोनापावला–म्हापसा दरोडा प्रकरणाचा मोठा उलगडा; बांगलादेशी टोळीचे ६ आरोपी जेरबंद
गोव्यातील आयआयटी प्रकल्पासाठी फर्मागुडी येथील जागेचा पर्याय; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती
निवडणूक आणि संघटनात्मक मजबुतीसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची दिल्लीवारी; राष्ट्रीय अध्यक्षांशी केली चर्चा