गोवा खबर : गोवा प्रदेश काँग्रेस समितीने (GPCC) संघटन बळकटीकरणाची व्यापक मोहीम हाती घेतली असून, १८ जून या ऐतिहासिक क्रांती दिनाच्या प्रेरणेतून पक्ष नव्या राजकीय व संघटनात्मक अभियानाची सुरुवात करणार आहे. या निमित्ताने पक्ष आपली भावी रणनीती जाहीर करणार असून संघटनात्मक पुनर्रचनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात येणार आहेत. तसेच भाजप सरकारच्या अपयशाविरोधातील जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव तथा गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, पक्षातील सर्व अंतर्गत चर्चा व मतभेद सौहार्दपूर्ण वातावरणात मिटले असून काँग्रेस आता एकसंघ, केंद्रित आणि गोव्यात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
पणजी येथील काँग्रेस भवनात माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष एम. के. शेख, अल्टोन डी’कोस्टा आणि कार्लोस आल्वारेस फरेरा उपस्थित होते.
माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेचा भाग म्हणून लवकरच प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी तसेच इतर संघटनात्मक समित्यांची पुनर्बांधणी जाहीर करण्यात येईल. याशिवाय जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि भाजप सरकारच्या अपयशाचा व त्रुटींचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम राबविण्यात येतील.
पक्षाची भावी वाटचाल, संघटन विस्तार आणि आगामी राजकीय आव्हानांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व नेते व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे तसेच वैयक्तिक महत्त्वाकांक्षा संघटनहिताच्या आड येऊ देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि बळ देण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कुशासन, भ्रष्टाचार आणि जनविरोधी धोरणांपासून गोव्याची मुक्तता करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जनसंपर्क अधिक वाढवून राज्यभर काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न तीव्र करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले की, कोणत्याही राजकीय पक्षामध्ये संघटनात्मक बदल ही नियमित आणि आवश्यक प्रक्रिया असते. त्यामुळे त्याकडे वादाच्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता नाही. पक्षहित आणि संघटन बळकटीकरण लक्षात घेऊन सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला की, पक्ष अधिक मजबूत, अधिक एकसंघ आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम होईल. गोव्यापुढील राजकीय आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी तसेच राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.