Connect with us

गोवा खबर

‘WAVES (वेव्ह्ज) फिल्म बाजार पटकथा लेखक प्रयोगशाळा 2026’ साठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने अर्ज मागवले

Published

on

Spread the love


गोवा खबर : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) ‘WAVES’ फिल्म बाजार स्क्रीनरायटर्स लॅब 2026′ साठी अर्ज मागवले आहेत. काल्पनिक कथांवर आधारित  पूर्ण-लांबीच्या चित्रपटांच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्या भारतीय पटकथा लेखकांसाठी हा एक वार्षिक पटकथा विकास कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम केवळ भारतात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी खुला आहे.

होतकरू लेखकांना नामवंत पटकथा लेखक आणि चित्रपट सृष्टीतील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पटकथा अधिक मजबूत आणि दर्जेदार होण्यास मदत करून, मूळ कथालेखनाला चालना देणे, हा, एनएफडीसी आणि वेव्ह्ज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या ‘स्क्रीनरायटर्स लॅब’चा उद्देश आहे.

सखोल मार्गदर्शन आणि या उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी होणाऱ्या संवादाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सहभागींना, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या पटकथा विकास पद्धतींशी परिचित करून देतो आणि त्यांना त्यांचे प्रकल्प भारत आणि जगभरातील निर्माते, वित्तपुरवठादार आणि उद्योग निर्णयकर्त्यांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी तयार करतो.

पात्रता :

अर्जदारांनी खालील निकष पूर्ण करणे आवशयक आहे:

  1. हा कार्यक्रम केवळ भारतात वास्तव्यास असलेल्या भारतीय  नागरिकांसाठी खुला आहे.
  2. केवळ काल्पनिक कथांवर आधारित पूर्ण-लांबीच्या चित्रपटांचे प्रकल्पच सादर करण्यासाठी पात्र आहेत.
  3. सादर करण्यात येणाऱ्या पटकथा, पटकथा लेखक संघटना अर्थात ‘स्क्रीनरायटर्स असोसिएशन’ (SWA) किंवा तत्सम मान्यताप्राप्त संस्थेकडे नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. नोंदणी न केलेल्या पटकथा स्वीकारल्या जाणार नाहीत.
  4. परतावा न मिळणाऱ्या अर्ज शुल्काचा भरणा केल्यानंतरच अर्ज पूर्ण आहे असे मानण्यात येईल. ‘लॅब’च्या पुढील टप्प्यांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
  5. अर्ज करण्याच्या टप्प्यावर, पटकथा आणि सर्व संवाद इंग्रजी भाषेत सादर करणे आवश्यक आहे. पूर्ण झालेला चित्रपट मात्र कोणत्याही भारतीय भाषेत तयार केला जाऊ शकतो.
  6. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल अथवा त्याचे संपादन करता येणार नाही.
  7. निवड झालेल्या सहभागींना प्रत्यक्ष उपस्थित राहून ‘हमीपत्रावर’ स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे.
  8. हा कार्यक्रम तीन टप्प्यांत होणार असून, तिन्ही सत्रांना उपस्थित राहणे आणि ‘ वेव्हज’ फिल्म बाजार’मध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे.

अर्ज शुल्क आणि अंतिम मुदत :

  • सुरुवातीचा टप्पा अंतिम मुदत : 28 जुलै 2026,  – रु. 8,000
  • वाढीव अंतिम मुदत : 4 ऑगस्ट, 2026 – रु. 9,000
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:59 पर्यंत बंद होईल.

लॅबचे वेळापत्रक

  • सत्र 1 (5 दिवस): ऑगस्ट 2026 च्या अखेरीस
  • सत्र 2 (ऑनलाइन): ऑक्टोबर 2026 च्या मध्यावर (अंदाजित)
  • सत्र 3 (5 दिवस): WAVES फिल्म बाजारपूर्वी
  • WAVES फिल्म बाजार: 20 ते 24 नोव्हेंबर 2026

इच्छुक अर्जदार पात्रतेचे तपशीलवार निकष, अर्ज सादर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तसंच  नियम आणि अटीं जाणून घेण्यासाठी ‘WAVES Film Bazaar’ च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.