Connect with us

गोवा खबर

मराठीला राजभाषेचा दर्जा न दिल्यास निवडणुकीत उत्तर देऊ; वेलिंगकर यांचा इशारा

Published

on

Spread the love

गोवा खबर : येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राजभाषा कायद्यात दुरुस्ती करून कोकणीप्रमाणेच मराठीलाही राभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गोमंतकीय करत आहेत. सरकारने या अधिवेशनात मराठीला राभाषेचा दर्जा दिल्यास आगामी निवडणुकीत जनता भाजपाच्या पाठीशी उभी राहील; परंतु सरकारने पुन्हा फसवणूक केल्यास २०१७ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला आहे.

फोंडा येथील विश्व हिंदू परिषद सभागृहात आयोजित ‘मराठी सद्भावना मिलन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी आंदोलनाला ४० वर्षांचा इतिहास असून, ही निवडणूक-पूर्व अधिवेशनाची वेळ असल्याने जनतेला याच अधिवेशनात ठोस निकाल हवा आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला मुसळधार पावसातही विविध क्षेत्रांतील ६० पेक्षा जास्त मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयंत मिरिंगकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. गो.रा. ढवळीकर यांनी गेल्या सव्वा वर्षातील आंदोलनाच्या वाटचालीची माहिती दिली. चर्चेदरम्यान डॉ. दत्ताराम देसाई, कमलाकर साधले, कालिदास मराठे आणि दीपा मिरिंगकर यांनी आपले विचार मांडले. या प्रसंगी उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणाऱ्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या. डॉ. अनिता तिळवे यांनी मानलेल्या आभारप्रदर्शनानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.