गोवा खबर : केंद्र सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालया अंतर्गत, औषधनिर्माण विभागाचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या 9 व्या इंडिया फार्मा 2026 परिषदेची आज नवी दिल्ली येथे सुरुवात झाली. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स (आयपीए) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय (13-14 एप्रिल) परिषदेत जागतिक औषध निर्माण आणि आरोग्य सेवा परिसंस्थेतील प्रमुख भागधारक एकत्र आले असून, यात नवोन्मेष, आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वावर विशेष भर दिला जाईल.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आणि रसायने आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन सत्राला संबोधित केले. हे व्यासपीठ भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्राचे सामर्थ्य आणि वाढत्या जागतिक काल सुसंगततेचे प्रतिबिंब असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यांनी नमूद केले की, परवडणारी जेनेरिक औषधे पुरवणारा आघाडीचा देश म्हणून “जगाचे औषधालय”, अशी भारताची ओळख असून, आता जागतिक परिदृश्य वेगाने बायोलॉजिक्स, बायोसिमिलर्स आणि स्पेशालिटी औषधांकडे वळत आहे. “या बदलत्या वातावरणात, भारत केवळ परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठीच नव्हे, तर एक जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला येण्यासाठीही सुस्थितीत आहे,” असे ते म्हणाले. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि संशोधन क्षमता बळकट करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, जैवऔषध निर्माण क्षेत्रातील क्षमतांचा विकास करण्याच्या उद्देशाने नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या 10,000 कोटी रुपये खर्चाच्या बायोफार्मा शक्ती उपक्रमाचा उल्लेख केला.
इंडिया फार्मा 2026, हे या क्षेत्रासाठी संवाद, भागीदारी आणि भविष्याभिमुख आराखडा विकसित करण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ प्रदान करेल, असे ते म्हणाले.
भारत, जागतिक जेनेरिक क्षेत्रातील अग्रणी, ते उदयोन्मुख बायोफार्मा नवोन्मेष केंद्र म्हणून प्रस्थापित होण्यापर्यंतच्या महत्वाच्या स्थित्यंतरातून जात असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी अधोरेखित केले. भारत सध्या जागतिक जेनेरिक औषधांमध्ये जवळजवळ 20% वाटा उचलतो, आणि जागतिक लसींच्या मागणीपैकी सुमारे 70% मागणी पूर्ण करतो, यावरून देशाची मजबूत उत्पादन क्षमता अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले.
या दोन दिवसीय परिषदेत आणि प्रदर्शनात नवोन्मेषासाठी धोरणात्मक चौकट, औषध संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्ता, पुढील पिढीचे तंत्रज्ञान आणि जीवन विज्ञानातील भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा होईल.