गोवा खबर : तोफखाना रेजिमेंटच्या द्विशताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित ‘समुद्र साहस’ नौकानयन मोहिमेला आज मुंबईतल्या मार्वे इथून स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट आणि तोफखाना रेजिमेंटचे वरिष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांनी औपचारिकपणे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भारताचा समृद्ध सागरी वारसा आणि धोरणात्मक दूरदृष्टीचे प्रतिबिब असलेल्या चिरस्थायी सागरी वारशाला दिलेली एक मानवंदना आहे. एखाद्या तोफखाना रेजिमेंटद्वारे हाती घेण्यात आलेले हे पहिलेच ‘ब्लू वॉटर’ नौकानयन असून, ही मोहीम 21-फूट ‘सीबर्ड’ दर्जाच्या नौकांचा वापर करून कोकण किनारपट्टीवर सुमारे 520 नाविक मैल अंतर कापणार आहे. हा प्रवास चार टप्प्यांत आयोजित केला आहे: मुंबई ते विजयदुर्ग, विजयदुर्ग ते गोवा, गोवा ते विजयदुर्ग आणि विजयदुर्ग ते मुंबई.
किनारपट्टीपासून सरासरी सुमारे 7 नाविक मैल अंतरावरून प्रवास करताना, हा चमू 2-4 नॉट्स ते 10-15 नॉट्स दरम्यान बदलणाऱ्या वाऱ्यासह गतिशील सागरी परिस्थितीचा सामना करेल. या मोहिमेसाठी उत्कृष्ट नौकानयन कौशल्य, सहनशक्ती आणि समन्वयाची आवश्यकता आहे.
या मोहिमेचे नेतृत्व कॅप्टन क्षितीज नायर आणि सुभेदार प्रकाश फुंडे करत आहेत, तर मेजर वर्धन शिधये यांच्या मार्गदर्शनाखाली एक समर्पित ग्राउंड सपोर्ट टीम कार्यरत आहे. मोहिमेच्या प्रारंभापूर्वी, क्रू सदस्यांनी मार्वे इथल्या हेवी ब्रिज प्रशिक्षण केंद्रामध्ये पद्धतशीर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
या मोहिमेला भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे प्रशासकीय आणि कार्यात्मक सहकार्य लाभले आहे.
‘समुद्र साहस’ नौकानयन मोहीमेतून अचूकता, सांघिक कार्य, लवचिकता आणि सहनशक्ती या भारतीय लष्कराच्या मूळ गुणांचे दर्शन घडणार असून, या मोहिमेतून लष्कराच्या साहस, नेतृत्व आणि चिकाटीला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार होणार आहे.