आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५मध्ये पार्किन्सन्सबाबत जागृती आणि आवश्यक साह्य करणाऱ्या पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या कार्यावर प्रकाशझोत
गोवा खबर: पार्किन्सन्सच्या आजाराने भारतातील अंदाजे १५ लाख लोक ग्रस्त आहेत, तर हजारो लोक या आजाराने ग्रस्त असलेल्या प्रियजनांची शांतपणे देखभाल घेत राहतात. या समस्याबाबत जागरूकता मर्यादित राहिली असल्याने रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना अनेकदा प्रचंड शारीरिक, भावनिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर, तळागाळापर्यंत जागृती करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवी साह्यगटांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरत आहेत.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या शेवटच्या दिवशी, पार्किन्सन्सचा आजार हा चर्चेचा एक महत्त्वाचा विषय होता. पार्किन्सन्समुळे पती गमावलेल्या आणि रुग्णांना आणि काळजीवाहकांना मदत करण्यासाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या महिलांचा गट असलेल्या पार्किन्सन्स मित्र मंडळच्या कार्यावर महोत्सवाचा एक भाग म्हणून प्रकाशझोत टाकण्यात आला. हा गट आपले अनुभव मांडण्यासाठी, या समस्येने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मदत करण्याबाबत व्यावहारिक दृष्टिकोन शिकविण्यासाठी आणि भावनिक आधार देण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करतो.
पार्किन्सन मित्र मंडळच्या सदस्या विजयालक्ष्मी रेवणकर या उपक्रमाचे वर्णन करुणा आणि निर्धारातून निर्माण झालेला “स्वयं-सहाय्यता गट” असे करतात. “या आजाराने आमचे पती गमावले असले तरी, आम्हाला रुग्णांना आणि काळजीवाहकांना मदत करत राहायचे होते. रुग्णांशी नियमितपणे बोलत राहणे आणि त्यांना अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला आधार देत राहणे या विचारावर विश्वास ठेवतो,” असे विजयालक्ष्मी रेवणकर म्हणाल्या.
रुग्णांना आणि काळजीवाहकांना भेडसावणाऱ्या आव्हानांची सखोल समज आणि सकारात्मक परिणाम घडविणे हा ध्यास, याच्या आधारे या गटाने आपले प्रयत्न राबविले आहेत.
पत्रकार परिषदेत पार्किन्सनची लक्षणे आणि परिणाम अधोरेखित करण्यात आले. यामध्ये शरीराला कंप सुटणे, विविध अवयवांची लवचिकता कमी होऊन ते कडक होणे, शरीराची मर्यादित हालचाल, नैराश्य, सामाजिकदृष्ट्या अलिप्तता वाढणे आणि दैनंदिन कामांमध्ये अडचण अशा लक्षणांचा समावेश आहे. या आजारावर कोणताही इलाज नसला तरी, औषधे आणि उपचारांमुळे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते.
“पार्किन्सनमुळे अनेक आव्हाने येत राहतात, पण त्यांना आपले जीवन परिभाषित करू देऊ नये,” असा मुद्दा रेवणकर यांनी ठामपणे मांडला. “आमच्या मंडळातील सदस्य ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आहेत. आम्ही आमचे पती गमावले आहेत, परंतु कधीही आमचा आशावाद डगमगू दिला नाही. ‘आमच्यासोबत आनंद साजरा करा’ या ब्रीदवाक्यानुसार आम्ही जीवन जगतो. एकमेकीचे अनुभव, अडचणी जाणून घेतल्यावर जाणीव होते की जीवनाच्या या टप्प्यावरही जीवनाचा भरपूर आनंद घेता येतो.”
पार्किन्सन्स मित्र मंडळाद्वारे आरोग्याची विविधांगी काळजी व सुरक्षणा जपण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. मंडळाच्या उपाध्यक्षांनी योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम असा व्यायाम मेंदूला प्राणवायू उपलब्ध करण्यासाठी तसेच मानसिक व शारिरीक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. हा गट डॉक्टर आणि अमेरिकन पार्किन्सन डिसीज असोसिएशनसारख्या संस्थांसमवेत सहयोगाने कार्यरत आहे.
या गटाचे कार्य रुग्णांच्या मदतीपलीकडे विस्तारले गेले आहे. पार्किन्सन्सची समस्या, त्याचे रुग्णावर तसेच कुटुंबियांवर होणारे परिणाम याबाबतही जागृती घडविण्याचे प्रयत्न करतात. आपले अनुभव आणि ज्ञान-माहितीची देवाणघेवाण करून, हे मंडळ लोकांना शिक्षित करण्याचे, समाजामध्ये समज आणि सहानुभूती वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवतात. या गटाचा विस्तार आणि विकास होत असताना, पार्किन्सन्सने बाधित झालेल्यांचे जीवन सुधारण्यासाठी सामायिक अनुभवाची परिवर्तनकारी शक्ती हा मिंत्र मंडळ गट प्रदर्शित करतो.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या माध्यमातून घडणारे असे संवाद आणि चर्चांद्वारेच, अशा प्रकारच्या समस्यांवर आपले अनुभव, आपल्या समस्या मांडण्यासाठी लोक पुढे येतात, यातून जागृती घडते, समज वाढते आणि यावर मात करण्यासाठी पाठबळ आणि उपाययोजना शोधण्याच्या वाटा मिळत राहतात.