गोवा खबर : भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा ब्लॉकबास्टर चित्रपट ‘शोले’ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे, आणि यामागील कारण म्हणजे त्याचे भारतीय नवरस परंपरेवर आधारित भावनिक बांधकाम, असे प्रसिद्ध पटकथालेखक अंजुम राजाबली यांनी सांगितले.
पिळर्ण येथील म्युझियम ऑफ गोवा (मोग) मध्ये झालेल्या मोग सन्डे सत्रात, १९७५ साली प्रसिध्द दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘शोले’च्या ५० वर्षांनिमित्त आयोजित चर्चासत्रात राजाबली यांनी सांगितले की, ‘शोले’चे यश केवळ त्यातील नायक, भव्य दृश्ये किंवा प्रसिद्ध संवादांमुळे नाही. त्याची खरी ताकद आहे त्याच्या भावनिक रचनेत, जी भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ या प्राचीन ग्रंथात वर्णन केलेल्या नवरसांवर आधारलेली आहे.
या नवरसांमध्ये, शृंगार (प्रेम), हास्य (हास्य), करुण (दुःख), रौद्र (राग), वीर (शौर्य), भयानक (भीती), बीभत्स (किळस), अद्भुत (आश्चर्य), आणि शांत (शांती), या नऊ भावना येतात. राजाबली यांनी सांगितले की या सर्व भावना शोलेमध्ये प्रभावीपणे विणलेल्या आहेत, म्हणूनच हा चित्रपट पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात घर करून राहीला आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, ‘रस’ ही फक्त बौद्धिक संकल्पना नसून ती प्रेक्षकांना प्रत्यक्ष जाणवणारी अनुभूती आहे. उदाहरणार्थ, जयचा (अमिताभ बच्चन) शेवटचा त्याग, प्रेक्षकांना आधीच माहित असले तरी, त्या क्षणी निर्माण होणारी भावना आणि दुःख यामुळे कथा अजून प्रभावी बनते.

राजाबली यांनी सांगितले की, शोलेमधील विनोद हा कथेतून बाहेर नेणारा घटक नाही, तर तो एक भावनिक समतोल राखणारा घटक आहे. “सूरमा भोपाली आणि बसंती यांचे प्रसंग प्रेक्षकांना हसवतात, पण त्याचवेळी तणावाची जाणीवही टिकवतात,” ते म्हणाले.
त्यांनी या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीमुळे ‘रस’ कसा आकार घेउ लागला यावरही आपले विचार मांडले. गब्बर सिंगच्या भुमिकेसाठी अमजद खानची निवड आठवून त्यांनी सांगितले की सलीम खान यांना वाटत होते की हा अभिनेता कोणताही अभिनयाचा अतिरेक न करता भयाची भावना निर्माण करू शकतो. “त्याच्या डोळ्यांमध्ये काहीच भावना नव्हती — जणू मृत डोळे,” असे त्यांनी चित्रपटाचे सहलेखक सलीम खान यांचे उद्गार सांगितले. याचमुळे गब्बर सिंग ह्या पात्राने तिरस्कार, भीती आणि द्वेष या भावना नैसर्गिकपणे जागवले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजाबली यांनी सांगितले की, रस सिद्धांत आजच्या सिनेमातही अत्यंत महत्त्वाचा आहे. “तुम्हाला तो शास्त्र म्हणून माहीत असण्याची गरज नाही, तुम्ही तो अनुभवता,” ते म्हणाले. जर एखादा रस कमी केला असता, तर शोलेचा प्रभाव निश्चितच कमी झाला असता, असे ते पुढे म्हणाले.
त्यांच्या मते, शोलेचे यश म्हणजे गंभीर नाट्य आणि भावनिक गहराई यांचा समतोल. भारतीय चित्रपटांत आजही “शांत रस” कमी वापरला जातो, तरी शोले शेवटी एक शोकात्मक संतुलन (tragic equilibrium) निर्माण करते, जे त्याला भावनिकदृष्ट्या परिपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या जिवंत ठेवते.