गोवा खबर:पर्यटन, माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री रोहन खवंटे यांनी आज म्हापसा येथे गोवा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण केले. गोव्याला वसाहतवादापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून गोव्याला आदर्श राज्य बनविण्याची जबाबदारी लोकांनी स्वीकारली तर विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार होऊ शकेल असे सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री श्री खवंटे यांनी सोशल मीडियावर गोव्याची प्रतिमा खराब करण्याचा लोक प्रयत्न करीत आहेत. तथापि राज्याने पर्यटनाचा खूप भक्कम पाया रचला असून तो आंतरराष्ट्रीय स्थळ म्हणून प्रस्थापित झाला आहे आणि त्याची प्रतिमा खराब होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना श्री. खवंटे यांनी राज्य सरकारने पुनर्जिवीत पर्यटन, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय पर्यटन, योग आणि निरोगीपणा इत्यादी उपक्रमांद्वारे गोव्यातील पर्यटन सुधारण्यासाठी अनुकरणीय पावले उचलली आहेत असे सांगितले. सरकारने गोव्यातील पारंपारिक सणांना चालना देण्यावर भर दिला आहे असे ते म्हणाले. गोव्याची ओळख आणि वारसा जपण्यासाठी काळजी घेतली जात आहे असेही ते पुढे म्हणाले.
श्री.खवंटे यांनी सरकारने फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि पर्वरी येथील टाऊन स्क्वेअर यासारखे उल्लेखनीय प्रकल्प हाती घेतले आहेत असे सांगितले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात श्री खवंटे यांनी सरकार ग्रामीण डिजिटलायझेशनवर लक्ष केंद्रित करून नेट कनेक्टिव्हिटी सुधारत आहे असे सांगितले. त्यांनी राज्यात मोफत वायफाय स्पॉट वाढविण्यासाठी सरकारच्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी श्री कबीर शिरगावकर व श्री पांडुरंग गाड, मामलेदार श्री अनंत मलिक, स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी व इतर उपस्थित होते.