Connect with us

गोवा खबर

गोव्यात व्हिसाची मुदत संपूनही बेकायदेशीर राहणाऱ्या ७ परदेशी नागरिकांना एफआरआरओकडून हद्दपार करण्याची कारवाई

Published

on

Symbolic Image
Spread the love

गोवा खबर : गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली येऊन व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध ‘फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस’ने (FRRO) आपली धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. एफआरआरओच्या पथकाने १५ मे २०२६ रोजी उत्तर गोव्यातील मांद्रे येथे राबवलेल्या एका विशेष मोहिमेदरम्यान बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणखी ७ परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये ५ रशियन, १ युक्रेनियन आणि एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांना मायदेशी हद्दपार (डिपोर्ट) केले जाणार आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चालू मे २०२६ या एकाच महिन्यात आतापर्यंत ९ परदेशी नागरिकांना शोधून त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. यामध्ये युगांडाचे ५, रशियाचे ३ आणि नायजेरियाच्या एका नागरिकाचा समावेश आहे. या सर्व कायदेभंग करणाऱ्या परदेशी नागरिकांना ‘काळ्या यादीत’ (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत अशा २७ परदेशी नागरिकांना भारतातून बाहेर काढण्यात आले आहे, तर गतवर्षी म्हणजेच २०२५ मध्ये एकूण १२९ परदेशी नागरिकांवर (ज्यामध्ये बांगलादेशी नागरिकांचाही समावेश होता) हकालपट्टीची मोठी कारवाई करण्यात आली होती.

घरमालकांना आणि हॉटेल चालकांना कडक इशारा या कारवाईच्या पार्श्वभूमीवर एफआरआरओ प्रशासनाने राज्यातील सर्व हॉटेल मालक, गेस्ट हाऊस चालक, होम-स्टे पुरवठादार आणि घरमालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांच्याकडे राहणाऱ्या कोणत्याही परदेशी नागरिकांचे ‘सी-फॉर्म’ (C-Form) वेळेत आणि अचूकपणे सादर करावेत. यामध्ये कसूर केल्यास किंवा माहिती लपवल्यास संबंधित घरमालकांवर आणि हॉटेल चालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई एफआरआरओचे पोलीस अधीक्षक अर्शी आदिल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक/उपअधीक्षक ब्राझ मिनेझिस यांच्या देखरेखीखाली आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. गोव्यात येणाऱ्या खऱ्या आणि कायद्याचे पालन करणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या हिताचे रक्षण करतानाच, बेकायदेशीर राहणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहील, असा निर्धार विभागाने व्यक्त केला आहे.