गोवा खबर : “वादळासारखा आलास, वादळासारखा जगलास… आणि वादळासारखाच निघून गेलास…” अशा अत्यंत भावूक वातावरणात फोंड्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी साईनगर-फोंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाची वार्ता समजताच फोंडा परिसरासह संपूर्ण गोव्यात शोककळा पसरली.
शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव पिळये-धारबांदोडा येथील आरोग्य केंद्रातून मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. या वेळी आमदार एल्टन डिकॉस्टा आणि काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. तपासणीनंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचे पार्थिव फोंडा येथील साईनगर निवासस्थानी आणताच अंतिम दर्शनासाठी चाहत्यांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. गर्दी एवढी अलोट होती की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
संध्याकाळी साडेपाच वाजता साईनगर येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. लोकांच्या आग्रहास्तव त्यांचे पार्थिव काही वेळ राजीव कलामंदिर परिसरातही अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या अभूतपूर्व गर्दीमुळे फोंडा शहरातील वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली होती. राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून भाटीकर यांना साश्रू नयनांनी निरोप दिला.
दर शुक्रवारी घडायची भेट : सुदिन ढवळीकर यांनी जागत्या केल्या आठवणी डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर भावूक झाले. त्यांनी भाटीकर यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, “केतन मला आपल्या आई-वडिलांनंतर गुरुस्थानी मानत होता, ही भावना त्याने अनेकदा व्यक्त केली होती. दर शुक्रवारी आमची भेट ठरलेली असायची. त्याच्या अचानक जाण्याने मला वैयक्तिक पातळीवर खूप मोठा धक्का बसला आहे. एक चांगल्या घरातील उमदा युवक, निष्णात डॉक्टर आणि अत्यंत सक्रिय कार्यकर्ता आपण गमावला आहे. तो नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असायचा. गेल्या काही वर्षांपासून दर शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात अभिषेक करण्यासाठी तो आवर्जून यायचा, तिथे आमची भेट व्हायची आणि अनेक विषयांवर चर्चा व्हायची. त्याचे असे अचानक जाणे अत्यंत वेदनादायी आहे.”
ट्रस्टच्या माध्यमातून अविरत मदत डॉ. केतन भाटीकर यांनी समाजकारणात प्रवेश केल्यापासून फोंडा आणि आसपासच्या परिसरात मोलाचे कार्य केले होते. कोणत्याही गरिबाच्या किंवा गरजूच्या निधनाची माहिती मिळताच त्यांची टीम आणि ते स्वतः धावून जायचे. ‘भाटीकर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून त्यांनी फ्रीझिंग शवपेटीसुद्धा उपलब्ध करून दिली होती. इतरांच्या अंत्यसंस्काराला नेहमी धावून जाणाऱ्या केतन यांच्या स्वतःच्या अंत्यसंस्काराला एवढ्या लवकर उपस्थित राहावे लागेल, असे कोणालाच वाटले नव्हते, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.