गोवा खबर : पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेल्या संशयित सोहम सुशांत नाईक (रा. काकोडा-कुडचडे) याच्याविरुद्ध गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी केपे न्यायालयात रीतसर दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. संशयितावर आक्षेपार्ह लैंगिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणे आणि एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत.
कुडचडे पोलीस ठाण्यात २२ मार्च २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ०९/२०२६ अंतर्गत सोहम नाईकविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९४(१), २९४(२)(अ), पोक्सो कायद्याच्या अंतर्गत कलमे आणि गोवा बाल कायद्याच्या कलम ८(२) नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. संशयिताच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत आक्षेपार्ह लैंगिक व्हिडिओ आढळून आले होते, ज्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
१७ वर्षीय पीडितेवर अत्याचार केल्याचा दुसरा गुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, २४ मार्च २०२६ रोजी कुडचडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०/२०२६ अंतर्गत सोहम नाईकविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवला गेला. संशयिताने पीडित मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार भारतीय दंड संहिते अंतर्गत, गोवा बाल कायदा आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. ही घटना घडली तेव्हा संशयित सोहम नाईक हा स्वतः देखील १७ वर्षांचा (अल्पवयीन) असल्याने, या प्रकरणाचा सखोल आणि तांत्रिक तपास करून बाल न्याय मंडळासमोर (ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड) एक सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण ५ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ३ गुन्ह्यांचा तपास सध्या पोलीस करत आहेत. संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.