गोवा खबर:जपानी चित्रपट दिग्दर्शक केई इशिकावा यांनी आज पणजी येथे माध्यम संवादगृहात माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या दुसरा सिनेमा- अ पेल व्हीव ऑफ हिल्स’ या सिनेमाचे यंदा 56 व्या इफ्फी, महोत्सवात प्रदर्शन करण्यात आले आहे. ‘कंट्री फोकस: जपान’ या विशेष विभागात समाविष्ट केलेल्या या चित्रपटाद्वारे समकालीन जपानी सिनेमाचा विस्तृत परिचय इफ्फी रसिकांना करून देण्याचा प्रयत्न झाला.
उदयोन्मुख चित्रपटकर्मींच्या सर्जनशील ऊर्जेचे तसेच राष्ट्राच्या समृद्ध चित्रपटवैभवाची परंपरा पुढे नेणाऱ्या नामांकित दिग्दर्शकांच्या कलात्मक दृष्टिकोनाचे उत्सवमूर्ती स्वरूपात सादरीकरण करत, ‘कंट्री फोकस: जपान’ या विभागाने विविधतेने नटलेले विलक्षण चित्रपट प्रस्तुत केले. स्मृती, ओळख आणि अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या अंतरंग नाट्यकथांपासून ते ऐतिहासिक महाकाव्ये, मनोवैज्ञानिक थरारक कथा, बालविश्वावर आधारित कथानक आणि प्रस्थापित चौकटी मोडणाऱ्या, प्रयोगशील, अमूर्त व नॉन-लिनिअर कथनपद्धतीपर्यंत या विभागात जपानी सिनेमाची शैलीगत व विषयगत अशी अतुलनीय व्यापकता अनुभवता आली.
दिग्दर्शक इशिकावा हे चर्चेच्या सुरुवातीला म्हणाले की, ही माझी भारतातील पहिली भेट असून, हा अनुभव मी मनापासून आनंदाने उपभोगला आहे. हा चित्रपट नोबेल पुरस्कार विजेते लेखक काझुओ इशिगुरो यांच्या 1982 साली प्रकाशित झालेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. यावर्षी अनेक जपानी चित्रपट या विषयाचा शोध घेत आहेत, कारण दुसऱ्या महायुद्ध समाप्तीला 80 वर्षे पूर्ण होत आहेत. मला देखील या विषयावर बोलायची इच्छा होती; मात्र त्या काळाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे योग्य भाषाशैली शोधणे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरत होते. ही कादंबरी माझ्या नजरेस पडली तेव्हा, हा विषय मला अधिक सहजपणे समजला आणि ही कथा सांगण्यासाठी आत्मविश्वासही मला मिळाला.
चित्रपटाची कथा एका तरुण, उदयोन्मुख जपानी-ब्रिटिश लेखिकेभोवती फिरते, जी आपल्या आई एत्सुको यांच्या नागासाकीतील युद्धोत्तर अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिण्याच्या निर्धार करते. आपल्या मोठ्या मुलीच्या आत्महत्येच्या आठवणींनी अद्यापही त्रस्त असलेल्या एत्सुको, 1952 मधीलत्या काळातील स्वतःच्या गर्भावस्थेतील आठवणी आठवायला लागतात. त्यांच्या आठवणींचे केंद्रस्थान म्हणजे साचिको नावाची एक स्त्री जी स्वतःसाठी आणि तिची मुलगी मरिकोसाठी परदेशात नवीन आयुष्य घडवण्याचा निर्धार करते. मरिको अधूनमधून एका रहस्यमय स्त्रीशी संबंधित अस्वस्थ करणाऱ्या आठवणी पुटपुटू लागते. आईच्या नागासाकीतील आयुष्याच्या काही आठवणी आणि धागेदोरे जोडत असतांना, तरुण लेखिकेला एत्सुको सांगत असलेल्या कथनांमध्ये आणि तिच्या आठवणींच्या वास्तविकतेमध्ये त्रासदायक विसंगती दिसू लागतात.
इशिकावा यांनी सांगितले की, या कथेकडे त्यांना आकर्षित करणारे वैशिष्ट्य म्हणजे केवळ अणुबॉम्बचा दुःखद प्रसंग नसून, वेगवेगळ्या काळातील महिलांच्या अनुभवांबद्दलही आहे. चित्रपटाची पटकथा त्यांनी स्वतः लिहिण्याचा निर्णय घेतला आणि चित्रपटाचे संपादनही स्वतःच केले, असे त्यांनी स्पष्ट केले, कारण संपादन ही लेखन प्रक्रियेची अंतिम पायरी आहे, असे ते मानतात.
इशिकावा पुढे म्हणाले की, चित्रपटाचा सर्वाधिक योग्य शेवट ठरवतांना त्यांच्या चमुला जपान, युनायटेड किंगडम आणि पोलंड या तीन देशांच्या भिन्न दृष्टिकोनांचा समतोल साधावा लागला. प्रत्येक देशाची संवेदनशीलता आणि सौंदर्यदृष्टी वेगळी होती.
ब्रिटीश निर्मात्यांना अधिक स्पष्ट आणि ठळक निष्कर्ष हवा होता; तर पोलिश निर्मात्यांच्या मते, खुप संवाद असल्यास कथानकाचा प्रभाव कमी होईल, तर जपानी दृष्टीकोन या दोहोंच्या मधोमध होता, असे इशिकावा यांनी सांगितले.
या सहयोगी प्रक्रियेचा आणि या संदर्भात झालेल्या व्यापक चर्चेचा त्यांनी मनापासून आनंद घेतला, असे इशिकावा यांनी सांगितले. या चर्चांमुळेच चित्रपटाला योग्य असा शेवट मिळाला, असे त्यांनी नमूद केले.