गोवा खबर : गोव्यामध्ये सुरू असलेल्या 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 8 व्या दिवशी कला अकादमीच्या सभागृहात “नव ईशान्य सिनेमा आणि चित्रपट शिक्षण” या विषयावर विशेष चर्चासत्र पार पडले. या सत्रामध्ये ईशान्य भारतातील चित्रपट निर्मात्यांना घडवण्यात आणि तिथल्या कथा सांगण्याच्या परंपरांना आकार देण्यात चित्रपट शिक्षण संस्थांनी बजावलेली परिवर्तनकारी भूमिका अधोरेखित करण्यात आली. यावेळी ईशान्येतील आघाडीच्या दिग्दर्शकांनी आपले वैयक्तिक कलाप्रवास, अनुभव आणि त्या भागातील सिनेमाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला.
या चर्चेचे सूत्रसंचालन डॉमिनिक संगमा यांनी केले. यामध्ये मणिपूरचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते हाओबाम पाबन कुमार, तसेच आसामच्या प्रसिद्ध दिग्दर्शिका रिमा बोरा आणि महर्षी तुहिन कश्यप यांचा समावेश होता.
“स्वतःची ओळख मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही सुरूच” — हाओबाम पाबन कुमार
मणिपूरचे ज्येष्ठ दिग्दर्शक हाओबाम पाबन कुमार यांनी 1990 च्या दशकात औपचारिक चित्रपट शिक्षण घेताना आलेल्या अडचणींचा आणि आपल्या प्रवासाचा उलगडा केला. ते म्हणाले की, त्या काळात पुण्याचे एफटीआयआय आणि कोलकात्याचे ‘एसआरएफटीआय’ या दोनच प्रमुख संस्था अस्तित्वात होत्या, त्यामुळे ईशान्येतील होतकरू दिग्दर्शकांना प्रचंड स्पर्धेचा आणि मर्यादित संधींचा सामना करावा लागत असे. पाबन यांनी ‘एसआरएफटीआय’मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केलेला 6 वर्षांचा संघर्ष आणि दिग्गज दिग्दर्शक अरिबम श्याम शर्मा यांच्या हाताखाली केलेली उमेदवारी याच्या आठवणी सांगितल्या. या कठोर प्रशिक्षणामुळेच आपली कला अधिक प्रगल्भ झाली, सिनेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला आणि कथेच्या मांडणीतील बारकावे समजले, असे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत प्रगती झाली असली तरी, ईशान्येतील दिग्दर्शक आजही आपल्या कामाला योग्य व्यासपीठ आणि ओळख मिळावी यासाठी धडपडत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“खऱ्या कथा आपल्या मातीतून येतात” — महर्षी तुहिन कश्यप
महर्षी तुहिन कश्यप यांनी ‘एसआरएफटीआय’मधील शिक्षणामुळे आपली दृष्टी कशी बदलली यावर भाष्य केले. सुरुवातीला मुख्य प्रवाहातील बॉलीवूडच्या झगमगाटाकडे आकर्षित झालेल्या कश्यप यांना नंतर आसामच्या मातीशी जोडलेल्या अस्सल कथा मांडण्याचे महत्त्व उमजले. “आपल्या स्वतःच्या भूमीची आणि इतिहासाची समज हा केवळ एक शैक्षणिक अभ्यास नसून, स्थानिक आणि जागतिक स्तरावर प्रभाव टाकणाऱ्या कथा सांगण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे,” असे मत त्यांनी मांडले. खोलवर निरीक्षण करणे, चिकित्सक विचार करणे आणि आपल्या सांस्कृतिक वारशालच सर्जनशीलतेचा स्रोत मानणे, हे फिल्म स्कूलने शिकवल्याचे त्यांनी सांगितले.

“ईशान्येच्या सिनेमाला समृद्ध इतिहास आहे” — रिमा बोरा
‘एफटीआयआय’ने आपल्यातील सिनेमॅटिक समज आणि वैयक्तिक जडणघडणीला कसे खतपाणी घातले, हे रिमा बोरा यांनी सांगितले. अभ्यासक्रमात ईशान्येच्या सिनेमाचा अभाव असूनही त्यांनी आपला मार्ग शोधला. ईशान्य भारताला ‘इशानौ’ ते ‘गंगा सिलोनी पाखी’ आणि थेट 1935 पासूनच्या आसामी चित्रपटांचा समृद्ध इतिहास असूनही राष्ट्रीय चर्चाविश्वात या सिनेमाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अरुणाचल प्रदेशमध्ये नवीन फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना होणे हे ईशान्येच्या भाषा, परंपरा आणि कथांना व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगत त्यांनी याचे स्वागत केले.

“सर्वोत्कृष्ट कथा तुमच्या स्वतःच्या भूमीतून जन्म घेतात” — डॉमिनिक संगमा
चर्चेचे सूत्रसंचालन करताना डॉमिनिक संगमा यांनी कथाकथन आणि शिक्षण यावर भाष्य केले. आपल्याकडील कथा सांगण्याच्या मौखिक परंपरांचा संदर्भ देत ते म्हणाले की, जागतिक सिनेमाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या कथा मांडणीच्या कक्षा रुंदावल्या. “फिल्म स्कूल तुम्हाला या कथा पडद्यावर प्रभावीपणे मांडण्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास देते,” असे सांगून त्यांनी स्थानिक संस्कृती आणि समाजाची जाण असणाऱ्या कथाच सर्वात जास्त प्रभावी ठरतात, यावर भर दिला.

फिल्म स्कूल्स केवळ प्रतिभेला आकार देतात असे नाही, तर सांस्कृतिक ओळख जपण्यात आणि ईशान्येच्या सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यात मोलाची भूमिका बजावतात, या निष्कर्षासह चर्चेचा समारोप झाला. तसेच ईशान्येतील कथाकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी पायाभूत सुविधा, मार्गदर्शन आणि व्यासपीठांमध्ये सातत्याने गुंतवणूक करण्याची गरज यावरही चर्चासत्रात भर देण्यात आला.
