Connect with us

गोवा खबर

वाहन प्रशिक्षण केंद्रे आणि वैद्यकीय मंडळासाठी राज्य दिव्यांगजन आयुक्तालयाच्या वतीने जागृती उपक्रम

Published

on

Spread the love
गोवा खबर : राज्य दिव्यांगजन आयुक्तालयाच्या वतीने तसेच राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने हल्लीच राज्यातील वाहन प्रशिक्षण केंद्रांतील प्रतिनिधी आणि वैद्यकीय मंडळाच्या प्रतिनिधींमध्ये वाहन चालवण्याबाबत सक्षम असलेल्या दिव्यांग व्यक्कींच्या क्षमता स्तराबाबत जाणिव निर्मिती करण्याच्या उद्देशाने जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.
उत्तर गोवा जिल्ह्यासाठी सचिवालय-पर्वरी येथे तर दक्षिण गोव्यासाठी गुजरात समाज शाळा येथे या जागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांना राज्य दिव्यांगजन आयुक्तालयाचे सचिव ताहा हाजिक, प्रशासन उपसंचालिका नॅन्सी फर्नांडिस यांच्यासह सांकेतिक भाषा दुभाषी प्रसाद जोशी, विशांत नागवेंकर, महादेव सावंत आदी मान्यवरांचा या कार्यशाळांमध्ये सहभाग राहिला. तसेच परिवन विभागाचे अतिरिक्त संचालक (उत्तर गोवा) भालचंद्र ए. सावंत यांनी उत्तर गोव्याच्या कार्यशाळेत आणि अतिरिक्त संचालक (दक्षिण गोवा) संदीप देसाई यांनी दक्षिण गोव्याच्या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
दिव्यांग वाहकचालकांना सामावून घेण्याबाबतच्या आदर्श पद्धती, त्यांना भेडसावणारी आव्हाने आणि या अडथळ्यांवर मात करण्यासाठी धोरणे यासारख्या महत्वाच्या विषयांवर या कार्यशाळांमध्ये ऊहापोह करण्यात आला. वाहन चालवण्याच्या प्रक्रियेदरम्यान दिव्यांग वाहनचालकांसाठी साह्यभूत आणि सर्वसमावेशी वातावरण निर्माण करण्यासाठी वैद्यकीय मंडळ आणि ड्रायव्हिंग स्कूल यांच्या महत्वाच्या भूमिकांवरही या कार्यशाळांमध्ये भर देण्यात आला.
समाजामध्ये सर्वसमावेशकतेला प्राधान्य देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित करताना राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले, आम्ही समाजाच्या सर्व पैलूंमध्ये दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनविण्याचा आणि त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांमध्ये दिव्यांग वाहनचालकांबद्दल व्यापक समज आणि संवेदनशीलता विकसित करणे आवश्यक आहे. या दिशेनेच एक पाऊल या दोन कार्यशाळांच्या माध्यमातून उचलण्यात आलेले आहे.
गोवा राज्याने दिव्यांग व्यक्तींच्या हक्क-अधिकारांचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे वाहन प्रशिक्षण केंद्र, वैद्यकीय मंडळ अशा समाजातील प्रमुख कार्यघटकांमध्ये दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साह्य करण्याबाबत जाणिव निर्माण करणे, त्यांना आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करणे यासाठी अशा जागृती कार्यशाळांचे महत्व अधिक आहे. कोणत्याही शारिरीक क्षमतांच्या पलीकडे जात एक व्यक्ती म्हणून समाजात वावरताना समान संधी, समान न्याय उपलब्ध होईल आणि वाहन चालवण्यासाठीही स्वातंत्र्य मिळेल यासाठी सर्वसमावेशी समाज निर्मिती करण्यासाठी आणि लोकांमध्ये समज वाढवण्यासाठी अशा कार्यशाळा एक प्रभावी व्यासपीठ म्हणून काम करतात. या दिशेने सातत्याने प्रयत्न केल्यास अधिक संवेदनशील आणि सर्वसमावेशक गोवा निर्मितीचा मार्ग सुलभ करण्यास मदत होईल.