गोवा खबर : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ९० टक्के गुन्हे बिहारमधील आणि उत्तर प्रदेश येथील परप्रांतीय मजुरांकडून होत असल्याच्या कथित वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे आवाहन गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना केले आहे.
गोव्यात काम करणाऱ्या या राज्यांतील नागरी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवणार का, असा सवालही चोडणकर यांनी प्रमोद सावंत यांना केला आहे.
गिरीश चोडणकर यांनी या संदर्भात ट्वीट करून बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्ती करावी असे म्हटले आहे. तसेच गोवा राज्यात जे बिहार आणि उत्तरप्रदेश येथील नागरी सेवेतील अधिकारी आपली सेवा देत आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत अविश्वास दाखवणार का असा सवाल त्यांनी केला आहे.
‘‘गोव्यात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये 90% टक्के सहभाग बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगार वर्गाचा आहे असे अत्यंत अपमानास्पद विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राजेंद्र आर्लेकर हे बिहारचे राज्यपाल असल्याने त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे महत्वाचे आहे,’’ असे चोडणकर म्हणाले.
“सावंत यांनी हे वक्तव्य करताना बिहार आणि उत्तर प्रदेशातील आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकारी जे येथे सेवा बजावतात त्यांचाही विचार करायला हवा होता. परप्रांतीय कामगार आणि अधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीने भावना दुखवणे चुकीच आहे. आता मुख्यमंत्री या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवणार का?,’’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.
सोमवारी कामगार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान सावंत यांनी कंत्राटदार आणि कामाला घेणाऱ्या आस्थापनांना इशारा दिला होता की “गोव्यात सर्वाधिक गुन्हे परप्रांतीय मजुरांकडून होत आहेत”
“येथे कोणताही गुन्हा केल्यानंतर, परप्रांतीय आपल्या मूळ राज्यात परत जातो आणि नंतर त्यांना पकडणे कठीण होते. आपण प्रमाण पाहिल्यास, गोव्यातील 90 टक्के गुन्हे हे परप्रांतीयांकडून होतात. मग ते बिहारचे असोत किंवा उत्तर प्रदेश किंवा इतर भागात, मी त्यात तपशीलात जात नाही,” असे सावंत म्हणाले होते.