गोवा खबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोंडा येथे झालेल्या जाहीर सभेत म्हादईच्या मुद्द्यावर घेतलेले मौन म्हणजे डबल इंजिन सरकारने म्हादई कर्नाटकात वळविण्यास परवानगी दिल्याची पुष्टी आहे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले.
आलेमाव यांनी सोमवारी पत्रकार परिषद संबोधित करून भाजपवर टिकास्त्र सोडले. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी गोव्याच्या हिताशी तडजोड केल्याबद्दल भाजप सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, महिला अध्यक्षा बीना नाईक आदी उपस्थित होते.
युरी आलेमाव म्हणाले की, म्हादईच्या मुद्द्यावरून ‘भ्रष्ट जुमला पक्षा’ने गोव्याचा विश्वासघात केला आहे आणि त्यांनी आपल्या नेत्यांच्या संगनमताने आधीच पाणी वळवले आहे.
“कर्नाटकात प्रचार करताना अमित शहा यांनी कर्नाटकला आधीच पाणी दिले आहे, असे स्पष्टपणे सांगितले होते. आता गोव्यातील सभेत त्यांनी म्हादईवर मौन धारण केले, याच्यावरून हे स्पष्ट होत आहे की त्यांनी कर्नाटकात म्हटले होते ते खरे आहे आणि म्हादई त्यांनी वळवली आहे,‘ असे आलेमाव म्हणाले.
जानेवारीमध्ये, कर्नाटकातील बेळगावी येथे एका सभेत अमित शहा म्हणाले होते: “सोनिया गांधी यांनी 2007 साली गोव्यात केलेल्या भाषणात म्हटले होते की, काँग्रेस सरकार म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवण्याची परवानगी देणार नाही. 2022 मध्ये काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात असे म्हटले होते की कर्नाटकला म्हादईचा एक थेंबही पाणी मिळणार नाही. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, केंद्रातील भाजपने गोवा आणि कर्नाटकमधील म्हादईचा दीर्घकाळचा वाद मिटवला आहे आणि म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवण्याची परवानगी दिली आहे. अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
“मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे इतर आमदार अमित शहा यांच्या बरोबर सभेला उपस्थित होते. पण म्हादईवर अमित शहांना प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांनी केले नाही,‘‘ असे ते म्हणाले.
आलेमाव म्हणाले की, भाजपने म्हादईचा राजकीय अस्त्र म्हणून वापर करून जनतेची फसवणूक केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात की ते 4 महिन्यांत खाणकाम सुरू करणार आणि अमित शहा म्हणतात की ते पुढील एका वर्षात हा वेवसाय पुन्हा सुरू करणार. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा,” असा प्रश्न त्यांनी केला आणि दोन्ही इंजिनांनी गोव्याच्या हिताशी तडजोड केली आहे असे म्हटले.
पणजीकर म्हणाले की, म्हादईच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याची अमित शहांना हिंमत नव्हती. “भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी अमित शहांना प्रश्न करून आपले धाडस दाखवायला हवे होते. त्यांनी ते का केले नाही, असा सवाल पणजीकर यांनी केला.
पणजीकर म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधाला घाबरून भाजपने गोवा पोलिसांना सक्रिय केले आणि त्यांना आमचा पाठलाग करून आम्हाला ताब्यात घेण्यास सांगितले. “गुन्हे कमी करण्यासाठी पोलिसांनी ही सक्रियता दाखवायला हवी. भाजपचे आमदार जमीन बळकावण्यात गुंतले आहेत, पण पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत,” असे ते म्हणाले.
काँग्रेसने लहान राज्यांना कधीच महत्त्व दिले नाही, हा शहा यांचा आरोप फेटाळून लावत पणजीकर म्हणाले की, शाह यांनी स्वत: सोनिया गांधी म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्यात तयार नव्हती असे म्हटले होते. तेव्हा त्यांनी गोवा ह्या लहान राज्यालाच म्हत्व दिले होते. “आम्ही नेहमीच छोट्या राज्यांना महत्त्व दिले आहे आणि सोनिया गांधींनी ते सिद्ध केले आहे,” असे पणजीकर म्हणाले.
अमित पाटकर म्हणाले की, गोव्यातील जनता अमित शहा यांचे स्पष्टीकरण ऐकण्यास उत्सुक होते. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत ते तसे करण्यात अपयशी ठरले.
“त्यांनी संपूर्ण जाहीर सभेत म्हादईच्या मुद्द्याचा उल्लेखही केला नाही,” असे पाटकर म्हणाले.
ते म्हणाले की, भाजप जर छोट्या राज्यांना महत्त्व देत असेल तर 60 वर्षांच्या मुक्ती योजनेंतर्गत राज्य सरकाराला 150 कोटी रुपये देण्यात का अपयशी ठरले.
“माझ्या मते भाजप जाहीर सभेत उघडे पडले आहे. दोन्ही इंजिन निकामी झाले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या कृत्याचा मी निषेध करतो. सुदृढ लोकशाहीसाठी विरोधक असायलाच हवेत, पण भाजप तो नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
बीना नाईक म्हणाल्या की, भाजप लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. “आमची अटक हा ‘आवाज दाबण्याच्या’ भाजपच्या अजेंड्याचा भाग होता. ही हुकूमशाही आहे,” असे ती म्हणाली.