रेव्होलुशनरी गोवन्स शिष्ट मंडळाची अहमदनगरच्या प्रथम इन्स्टिट्युटला भेट
गोवा खबर:रेव्होलुशनरी गोवन्स च्या शिष्टमंडळाने काल महाराष्ट्रातील अहमदनगर मधील प्रथम इन्स्टिट्यूट या कौशल विकास संस्थेला भेट देऊन तिथल्या विविध अल्पकालीन अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेतली. रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब, सहसंस्थापक विशवेश नाईक, अजय खोलकर, मयूर आर्सेकर तसेच आरजीपीचे सांत आंद्रेतील आमदार विरेश बोरकर सध्या महाराष्ट्र राज्यातील अनेक कौशल विकास संस्थांच्या भेटी घेत आहेत.
प्रथम इन्स्टिट्यूटमध्ये युवकांसाठी देण्यात येणारे तांत्रिक शिक्षण हे अत्याधुनिक असून, तिथे शिक्षण घेणाऱ्या युवकांना नोकरीची हमी सुद्धा देण्यात येते. त्याचाच अभ्यास करण्यासाठी आम्ही ह्या संस्थेला भेट दिली असल्याचे मनोज परब म्हणाले.
गोवा राज्यात आजपर्यंत प्रथम इन्स्टिट्यूट संस्थेसारखे एकही संस्था नसून, राज्यात फक्त युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यामध्ये कालबाह्य तांत्रिक शिक्षण दिले जात असल्यामुळे त्या युवकाना सध्याच्या तंत्रज्ञानाची माहिती नसते. प्रथम इन्स्टिट्यूट या संस्थेत युवकांना २-३ महिन्यातच अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण दिले जाते पण आपल्या राज्यात १- २ वर्षांचा अभ्यासक्रम, आणि तेही कालबाह्य शिक्षण असल्यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी भेटत नाही. राज्य सरकारने प्रथम इन्स्टिट्यूट सारख्या संस्था गोव्यात उभाराव्या असे मत परब यांनी व्यक्त केले.