गोवा खबर:गोवा मराठी चित्रपट महोत्सवासाठी (GMFF) नोंदणी ऑनलाइन आणि राज्यातील निवडक ठिकाणी सुरू झाली आहे. GMFF हा देशातील सर्वात मोठ व अनेक वर्षे चालणारा विविध स्तरांमधील रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला मराठी चित्रपट महोत्सव आहे. यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर, शीर्षक प्रायोजक आय एफ बी मोड्युलर किचन ह्यांच्या सहयोगाने 13 वा महोत्सव दिनांक 5, 6 आणि 7 ऑगस्ट 2022 रोजी INOX आणि मॅक्विनेझ पॅलेस येथे, पणजी येथे संपन्न होणार आहे.
प्रेक्षक स्वतःचे प्रतिनिधी पास ऑनलाईन तसेच ऑफलाइन मिळवू शकतात . गोव्यातील एक स्टार्टअप – प्ले स्टोर वरील गोआ अँप किंवा www. Goa.app वेबसाइटवर किंवा
www.bookmyshow.com वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात तर प्रत्यक्ष पास नोंदणीसाठी खालील ठिकाणी पास उपलब्ध असतील
१. पणजी – विन्सन ग्राफिक्स, 309, गेरा इम्पेरियम 2 रिट्झ पाटो बिल्डिंग , पाटो
२. वास्को – विन्सन ग्राफिक्स , हॉटेल अनंताश्रमजवळ
३. मडगाव- माया बुक स्टोअर, विट्रोज मॅन्शन, इसिडोर बाप्टिस्टा रोड, मडगाव
४. फोंडा – , मोहक डिझायनर्स, नूतन मेडिकल स्टोअरजवळ, फोंडा येथे नोंदणी करता येईल.
उद्घाटन समारंभ आयनॉक्स पणजीम येथे 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रतिष्ठेचा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन या प्रमुख पाहुण्या असतील.
या फेस्टिव्हलमध्ये मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित सहेला रे, ओंकार बर्वे दिग्दर्शित धीड आणि पिल्लू बॅचलर या तीन भारतीय प्रीमियरसह २० हून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातील.
GMFF २०२२ ह्या महोत्सवात सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, नेहा पेंडसे, सई ताम्हणकर, अमेय वाघ, किशोर कदम, मृण्मयी गोडबोले, संजय जाधव, सुहरुद गोडबोले, संजय जाधव, प्रसाद ओक , गजेंद्र अहिरे यांच्यासह अनेक प्रमुख अभिनेते आणि दिग्दर्शक ह्यांची सन्मानीय उपस्तिथी अपेक्षित आहे.