Connect with us

गोवा खबर

युवा मिडफिल्डर आयुष छेत्री एफसी गोवाकडून करारबद्ध

Published

on

Spread the love

~ २०२१२२ आय लीग हंगामात केले होते तीन गोल ~

 

 

गोवा खबर: भारतातील एक प्रसिद्ध आयएसएल क्लब असलेल्या एफसी गोवा क्लबने युवा मिडफिल्डर आयुष छेत्री याला तीन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. करारामुळे हा खेळाडू २०२५ हंगामापर्यंत गौर्सचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

 

या कराराबद्दल आयुष याने आनंद व्यक्त केला आहे. एफसी गोवा हा देशातील एक सर्वोत्तम क्लब आहे. त्यातच आयएसएल म्हणजे इंडियन सुपर लीगमध्ये खेळण्याचे प्रत्येक फुटबॉलपटूचे स्वप्न असते. तशी संधी उपलब्ध केल्याबद्दल मी एफसी गोवा व्यवस्थापनाचा आभारी आहे, असे छेत्री याने एफसी गोवाडॉटइनला सांगितले.

 

एक मिडफिल्डर म्हणून मला कायम सर्वोत्तम खेळ करायला आवडतो. याशिवाय एफसी गोवा क्लब हा युवा आणि प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देतो. क्लबचा हा उद्देश तसेच व्यावसायिकतेवर आधारित फुटबॉल खेळण्याची स्टाईल मला भावली. मी मॅनेजमेंटशी बोललो तेव्हा त्यांनी माझे स्वागत करताना, तू भविष्यात आमच्या प्लॅन्सचा एक भाग असशील, असे आश्वासनही दिले. एफसी गोवा क्लब चे खूप चाहते आहेत. या फॅन क्लबबद्दल मी खूप ऐकले आहे, पाहिले आहे. त्यामुळे एफसी गोवा फॅमिलीचा भाग बनण्याचा मोठा आनंद आहे, असे आयुष म्हणाला.

 

एफसी गोवाचे फुटबॉल डायरेक्टर रवी पुस्कुर यांनी आयुषच्या कराराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भविष्यातील फुटबॉलचा विचार करता आम्ही आयुष छेत्रीसारख्या उमद्या खेळाडूला साईन केले. अनेक वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करतानाची त्याची कामगिरी सर्वोत्तम आहे. खेलाप्रति निष्ठा ही त्याची जमेची बाजू आहे. आय लीगच्या मागील हंगामात आयुष याने छाप पाडली. त्याचा फायदा त्याला आयएसएलमध्ये खेळताना होईल. क्लबकडून खेळताना त्याची कामगिरी बहरेल आणि तो सातत्य राखेल, असा विश्वास पुस्कुर यांनी व्यक्त केला.

सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिबद्ध

 

मिझोराममध्ये जन्मलेल्या आयुष याने पाचव्या वर्षापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. दमदार खेळाच्या जोरावर त्याने हिरो युथ लीगमध्ये १५ आणि १८ वर्षांखालील संघात अयझॉल एफसीचे प्रतिनिधित्व केले.

सातत्य राखलेल्या आयुषची दखल घेत मिझोरामच्या अयझॉल एफसीने त्याला २०२१-२२ हंगामात त्यांच्या प्रमुख संघात स्थान दिले. तसेच आय लीगमध्ये पदार्पणाची संधी दिली.

 

२०२१-२२ आय लीग हंगामात १९ वर्षीय आयुष हा अयझॉल एफसीकडून १० सामने खेळला. एक एप्रिलला झालेल्या सामन्यात त्याने गतविजेता गोकु लम केरला एफसी विरूद्ध केलेला गोल आय लीगमधील त्याचा पहिला गोल ठरला. त्यानंतर नेरोका एफसी आणि सुदेवा दिल्ली एफसीविरूद्धही गोल केले.

खूपच छोटी कारकीर्द असूनही आयुष छेत्री याने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे विशीमध्येच त्याला एफसी गोवा आणि आयएसएलचे दरवाजे खुले झाले.