गोवा खबर: जनता नेहमीच सर्वोच्च असते. भारतीय राज्यघटनेनुसार जनता सर्वोच्च आहे त्यासाठी राजभवनाने राज्यातील सर्व पंचायत क्षेत्रांना भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे असे,राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.
राज्यपाल श्री. पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी आज फोंडा तालुक्यातील मडकई व शिरोडा येथे भेट दिली. “संपूर्ण गोवा यात्रेचा” भाग म्हणून त्यांची ही भेट होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या “ग्राम स्वराज” संकल्पनेवर भर देताना राज्यपालांनी ही त्यांची स्वयंनिर्भर गावाची कल्पना होती, जी ग्रामीण पुनर्रचनेची एक अनोखी संकल्पना होती असे सांगितले. ते म्हणाले हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात गांधीजींनी विकसित केले होते. ग्रामस्वराज ही त्यांची संकल्पना ग्रामीण पुनर्रचनेच्या पर्यायी मॉडेल्सपैकी एक मानली जाते, ज्याचा प्राथमिक भर समाजाच्या सर्वांगीण विकासावर होता.
राज्यपालांनी मडकई येथे पूजा करून श्री नवदुर्गा देवतेचे आशीर्वाद घेतले. वीजमंत्री श्री रामकृष्ण ढवळीकर आणि मत्स्योध्योग मंत्री श्री नीळकंठ हाळर्णकर या भेटीदरम्यान उपस्थित होते.

राज्यपालांचे स्वागत श्रीदेवी नवदुर्गा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष शैलेंद्र पणजीकर यांनी केले.
तद्नंतर राज्यपालांनी आस्कणवाडा मडकई येथील सागरी शेती स्थळाला भेट दिली आणि उन्नत भारत अभियान संचालनालयाअंतर्गत गोवा विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या मुशेलच्या हार्वेस्टींग प्रक्रियेची माहिती घेतली. त्यांनी स्थानिक लाभार्थ्यांशी मुशेलच्या लागवडीच्या प्रक्रियेबद्दल तपशीलवार चर्चा केली. लागवडीच्या प्रक्रियेबद्दल राज्यपाल खूप प्रभावित झाले
त्यानंतर राज्यपाल ग्रामपंचायत सभागृह मडकई येथे आले आणि त्यांनी दुर्भाट, वाडी-तळावली, मडकई आणि कुंडई या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांशी संवाद साधला.
मडकईच्या सरपंच श्रीमती. लक्ष्मी तारी वळवईकर, कुंडई सरपंच श्री विश्वास फडते, वाडी-तळावलीचे सरपंच श्री दिलेश गावकर, बांदोडाच्या उपसरपंच श्रीमती. सलोनी गावडे यांनी त्यांच्या संबंधित गावांचा संक्षिप्त अहवाल सादर केला.
वीज मंत्री श्री रामकृष्ण ढवळीकर आणि मत्स्योध्योग मंत्री श्री नीळकंठ हलर्णकर हे संवाद कार्यक्रमाला उपस्थित होते. कुलगुरू श्री हरिलाल मेनन, गोवा विद्यापीठाचे निबंधक श्री नाडकर्णी, यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री रामकृष्ण ढवळीकर यांनी बचत गट, शेतकरी गट आणि इतर संलग्न संघटनांना मुशेल किंवा संबंधित शेती व्यवसाय करण्याचे आवाहन केले. गोव्यातील धोक्यात आलेल्या पिकांची काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आणि मडकई भागातील कारेल आंब्याच्या कमी होत चाललेल्या प्रजातींचा उल्लेख केला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री नीळकंठ हळर्णकर यांनी गोव्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे असे सांगितले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन करून स्थानिक शेतकऱ्यांनी पुढे येऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. मत्स्योध्योग खात्याकडे उपलब्ध असलेल्या विविध योजना आणि अनुदान सुविधांची मंत्र्यांनी माहिती दिली.
राज्यपाल श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी स्वच्छ भारत अभियानातील विद्यार्थी/ इंटर्न आणि स्वयंसहायता गटांचा उन्नत भारत अभियान, मडकई आणि गोवा विद्यापीठाचा उपक्रम म्हणून सत्कार केला.
नंतर राज्यपालांनी कुर्टी-खांडेपार आणि उसगाव येथील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांशी राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे संवाद साधला.
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कृषीमंत्री श्री रवी नाईक, कुर्टी- खांडेपारचे सरपंच श्री दादी नाईक, उसगांव गांजेच्या सरपंच अस्मिता गावडे यावेळी उपस्थित होत्या.
कृषीमंत्री श्री रवी नाईक यांनी पंचायत संस्थांना सरकारी निधीचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन केले आणि राष्ट्र उभारणीत सुदृढ नाते निर्माण करण्याचा सल्ला दिला.
राज्यपालांचे सचिव श्री मिहीर वर्धन, आय.ए.एस, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी पूजा कुमारी संवाद कार्यक्रमावेळी उपस्थित होत्या.
राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मडकई, फोंडा आणि शिरोडा येथील डायलिसिस रुग्णांना आर्थिक सहाय्य वितरित केले. राज्यातील एकूण ३५० डायलिसिस रुग्णांना लाभ मिळाला आहे अशी माहिती राज्यपालांनी दिली.
संपूर्ण गोवा यात्रेच्या आयोजनामागील उद्देश सांगून राज्यपाल म्हणाले की त्यांना दुर्गम भागातील लोकांचे ग्रामीण जीवन आणि जीवनाचा अभ्यास करायचा आहे. ते म्हणाले की त्याना गोव्यावर एक विशेष पुस्तक लिहायचे आहे.
कुर्टी खांडेपारचे माजी सरपंच श्री सांतान फर्नांडिस, उसगाव-गांजे पंचायतीचे सदस्य श्री रामनाथ डांगी यांनी अहवाल सादर केला.
आनंदीबाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. श्री सुशांत नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दर्शनासाठी शिरोडा येथील श्री कामाक्षी मंदिरात आगमन होताच राज्यपालांचे स्वागत श्री कामाक्षी संस्थानचे अध्यक्ष श्री राजेंद्र कामत व सचिव श्री सिद्धेश पै रायकर यांनी केले. जलसंसाधनमंत्री श्री सुभाष शिरोडकर हे यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. श्रीधरन पिल्लई यांनी शिरोडा, पंचवाडी, बोरी आणि बेतोडा-निरंकाल कोनशे या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांशी संवाद साधला. शिरोडाचे सरपंच श्री अमित शिरोडकर, बेतोडाचे सरपंच श्री विशांत गांवकर, पंचवाडीचे सरपंच श्री अमिर नाईक, बोरीच्या सरपंच श्रीमती ज्योती नाईक, शिरोडा जिल्हा पंचायत सदस्य श्री नारायण कामत, बोरीचे जिल्हा पंचायत सदस्य श्री दिपक नाईक बोरकर यावेळी उपस्थित होते.
राज्यपालांनी आज भेट दिलेल्या तिन्ही ठिकाणी आपल्या भाषणात त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.