Connect with us

गोवा खबर

पुढील वारीपूर्वी पंढरपुरात ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ उभारणार

Published

on

Spread the love

वारकरी दिंड्यांना प्रत्येकी १ ते ५ लाख रुपयांची आर्थिक मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

गोवा खबर: गोवा राज्य सरकारने राज्यातील वारकरी परंपरेला बळ देण्यासाठी आणि तिचा वारसा जतन करण्यासाठी एक मोठे व महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना त्यांच्या सदस्य संख्येनुसार १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.

वारीसाठी जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवासाचा खर्च सुलभ व्हावा यासाठी ही आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन दिवसांच्या आत जमा केली जाईल. यासोबतच वारकऱ्यांना पर्यावरणपूरक वारीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारतर्फे कापडी पिशव्या, टोपी आणि प्रथमोपचार साहित्याचे किटही वितरित करण्यात आले आहे. प्लास्टिकमुक्त व स्वच्छ वारी घडवून आणण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

येथे आयोजित आर्थिक साहाय्य वितरण व दिंडी प्रस्थान सोहळ्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंढरपूरची आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती श्रद्धा, एकता, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही पवित्र परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार विविध उपक्रम राबवत आहे. पंढरपूर येथे उभारण्यात येणारे ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ पुढील वर्षाच्या वारीपूर्वी पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे भवन पूर्ण झाल्यानंतर गोव्यातील वारकऱ्यांना आणि भाविकांना पंढरपूरमध्ये अत्यंत अल्पदरात निवासाची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या ‘देवदर्शन’ योजनेचा अधिक विस्तार करण्याचा सरकारचा विचार असून, अयोध्येत ‘गोवा राम निवास’ उभारण्याची योजनाही सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये गोव्यातील भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. या कार्यक्रमाला कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, विविध वारकरी दिंड्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. मंत्री रमेश तवडकर यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकार वारकरी समाजासाठी सातत्याने कल्याणकारी उपक्रम राबवत आहे. गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी या परंपरेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.