नझीर खान यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाच्या संयोजकपदी निवड; प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांचा भाजपला टोला
गोवा खबर : भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणूक जवळ आल्यामुळे अल्पसंख्याकांचे मत मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी राज्यातील अल्पसंख्यक समाज नेहमी काँग्रेस पक्षासोबतच राहील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला आहे.
पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित एका विशेष कार्यक्रमात नझीर खान यांनी गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अल्पसंख्यक विभागाच्या संयोजकपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला, त्यावेळी चोडणकर बोलत होते. भाजप केवळ निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिमांबद्दल खोटे प्रेम दाखवत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. या कार्यक्रमाला प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक, महिला अध्यक्षा प्रतीक्षा खलप तसेच काँग्रेसचे इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे बोलताना गिरीश चोडणकर यांनी आरोप केला की, केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात अल्पसंख्यक समाज सध्या भाजपच्या दबावाखाली वावरत आहे. भाजपशी संबंधित काही संघटना अल्पसंख्याकांवर हल्ले करून त्यांना धमकावण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत, परंतु काँग्रेस पक्ष नेहमीच या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. याच विषयावर बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष नेहमीच अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी लढत आला आहे आणि आता भाजपकडून काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. पक्षात काही जण पक्षविरोधी काम करत असले, तरी नवीन संयोजकांच्या नियुक्तीमुळे संघटना अधिक मजबूत होईल आणि सर्वांनी एकत्र व एकविचाराने पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.