Connect with us

गोवा खबर

जर्मन भाषा अभ्यासक्रम; गोव्यातील नर्सिंग विद्यार्थ्यांना युरोपमध्ये मोठी संधी

Published

on

Spread the love

साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते अभ्यासक्रमाचा प्रारंभ

गोवा खबर : जर्मन भाषा अभ्यासक्रमामुळे विशेषतः नर्सिंग व आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जर्मनीसह संपूर्ण युरोपमधील विविध देशांमध्ये रोजगाराच्या अत्यंत चांगल्या आणि नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. साखळी येथील ‘साई नर्सिंग इन्स्टिट्यूट’मध्ये ‘मातोश्री पद्मिनी दिन’ व त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जर्मन भाषा अभ्यासक्रमाचा शुभारंभ आणि स्टुडंट्स डेव्हलपमेंट फंडाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा पुरेपूर लाभ घेत जागतिक स्तरावर आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. हा विशेष फंड विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगताना त्यांनी मातोश्री पद्मिनी एज्युकेशनल सोसायटीने शिक्षण, आरोग्य जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि समाजसेवा क्षेत्रात केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनुपमा बोरकर यांनी ‘पॅलिएटिव्ह केअर’ या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि रुग्णसेवेमध्ये करुणा, संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांचे महत्त्व किती जास्त असते हे अधोरेखित केले. या कार्यक्रमादरम्यान नर्सिंग ट्यूटर रीमा परब, लॅब असिस्टंट कांचन नाईक आणि मल्टिटास्किंग स्टाफ दामोदर घाडी यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेसाठी विशेष सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या माजी अध्यक्षा सुलक्षणा सावंत, तसेच पांडुरंग कुर्टीकर, सुभाष मलिक, डॉ. ज्योती सावंत, रुपेश ठाणेकर, अनिल परब, शिवानंद गाऊन्स, शिशिर गुप्ता, सत्यनारायण, डॉ. विल्सन फर्नांडिस आणि डॉ. स्नेहा भागवत यांच्यासह संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.