Connect with us

गोवा खबर

त्र्यंबकेश्वरमधून संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; २५ हजारांहून अधिक वारकऱ्यांची उपस्थिती

Published

on

Spread the love

टाळ-मृदंगाच्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; त्र्यंबकेश्वर भक्तिरसात न्हाऊन निघाले

गोवा खबर: आषाढी वारीसाठी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज दुपारी सुमारे २.३० वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी २५ हजारांहून अधिक वारकरी आणि भाविक उपस्थित होते.

पालखी प्रस्थानापूर्वी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. याकडे वारकऱ्यांनी निसर्गाचा शुभसंकेत म्हणून पाहिले. पांडुरंगाच्या अभंगांनी परिसर दुमदुमला आणि “संत निवृत्तीनाथ महाराज की जय” च्या जयघोषात चांदीचा रथ मार्गस्थ झाला. यावेळी विश्वस्त पुजाऱ्यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली.

सोहळ्यास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मनसे नेते अमित ठाकरे, आखाडा परिषदेचे हरीगिरी महाराज, रवींद्रपुरीजी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रस्थानानंतर पालखी सुंदराबाई मठ, भगवती चौक येथे पोहोचली. तेथे चांदीचा रथ सुमारे ४० मिनिटे थांबविण्यात आला. त्यानंतर पालखीतील पादुका आणि संत निवृत्तीनाथ महाराजांची मूर्ती गोदावरी कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. तेथे नगरपालिकेच्या वतीने आयोजित महापूजेत नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी पतींसह सहभाग घेतला. मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले.

महापूजेदरम्यान दिंडीतील टाळकरी, कीर्तनकार, पताकाधारी वारकरी आणि तुळशीधारक महिला अभंगगायनात तल्लीन झाल्या होत्या. चौथी माथा परिसरातील नागरिकांनीही पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

दरम्यान, सुंदराबाई मठानंतर मोठी गर्दी असल्याने पालखीसोबत असलेले काही घोडे पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. यावरून काही काळ विश्वस्त आणि घोडेमालकांमध्ये शाब्दिक वाद झाला. तसेच रथावर अनावश्यक गर्दी करू नये, अशा सूचना असूनही काही ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले.

सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने मार्गावरील अतिक्रमणे हटवून आवश्यक व्यवस्था केली होती. पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पालखीचा पहिला मुक्काम श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, प्रयाग तीर्थ येथे झाला. आखाड्याचे सचिव महंत रमेश गिरी महाराज यांनी पालखीचे स्वागत केले. या वारीत सहभागी होण्यासाठी विविध भागांतील सुमारे ३५ दिंड्यांचे प्रमुख आणि वारकरी त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित होते.