Connect with us

गोवा खबर

अंजुणे धरणात केवळ १२% पाणीसाठा शिल्लक; राज्यातील धरणांतील घटती पातळी चिंताजनक

Spread the love

File Photo

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित पर्जन्यवृष्टी अद्याप झालेली नाही, त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घसरत असून संभाव्य पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा अभाव असल्याने अंजुणे धरणात सध्या केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीसाठा घटणे ही नियमित बाब असली, तरी यंदा एप्रिल महिन्यातच काही धरणांतील साठा ५० टक्क्यांखाली गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणातील पाणीसाठा २८ टक्क्यांवर घसरला आहे. तर बार्देश आणि डिचोली भागाची तहान भागवणाऱ्या तिळारी धरणातील पातळी ३१ टक्क्यांवर आली आहे. याशिवाय पंचवाडी धरणात २१ टक्के, चापोली धरणात ४० टक्के, आमठाणे धरणात ५२ टक्के तर गवाणे धरणात ४४ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. प्रमुख धरणांतील पाणीसाठा सातत्याने कमी होत असल्याने आगामी काळात पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनने लवकरच जोर धरला नाही किंवा उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही, तर टंचाईची तीव्रता अधिक वाढू शकते. विशेषतः शहरी भाग आणि पर्यटन पट्ट्यात पाण्याची मागणी वाढत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, पाणीपुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन राखावे आणि नागरिकांनीही पाण्याचा जपून व काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.