गोवा खबर : कुंकळ्ळी येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (एनआयटी) सुरू असलेल्या नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य न देता बाहेरच्यांची भरती केली जात असल्याचा गंभीर विषय समोर आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान हा विषय केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मांडला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्र्यांनी एनआयटीमधील सध्याची नोकरभरती स्थगित करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दुसऱ्या बाजूला राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय प्रक्रिया केंद्र सरकारकडून पूर्ण केली जात आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, एसटी नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आहे. या विषयाचा नियमितपणे पाठपुरावा केला जात असून, लवकरच राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.