-
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
गोवा खबर : २०२६ पर्यंत एकही खाण अवलंबित बेरोजगार राहणार नाही, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, खाणबंदीमुळे नोकरी गमावलेले कामगार, ट्रकमालक, बार्जमालक तसेच खाण व्यवसायाशी संबंधित सर्वांना रोजगाराची हमी देण्यात येईल. आतापर्यंत १२ खाण ब्लॉकचा लिलाव झाला असून त्यापैकी नऊ खाणी लवकरच सुरू होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच हा व्यवसाय चालवला जाईल.

सरकारने याआधीच डंप धोरण जाहीर केले असून त्यानुसार डंप लिलावही होणार आहेत. १३ व १४ ऑक्टोबर रोजी जप्त केलेल्या खनिजाचा ३१ वा ई-लिलाव पार पडणार आहे. या लिलावातून सुमारे १०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, ऑक्टोबरनंतर खनिज वाहतुकीला गती मिळेल. यामुळे ट्रकमालक, मशिनरीमालक आणि इतर खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
याशिवाय गोवा सरकारला विविध सुधारणांसाठी ‘स्कोच पुरस्कार’ही प्राप्त झाले आहेत. कचरा व्यवस्थापन, महिला व बालकल्याण, तांत्रिक शिक्षण, क्रीडा, पोलीस विभाग अशा सहा खात्यांचा या पुरस्कारांत समावेश आहे.