गोवा खबर : राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून सुविधा मिळवणाऱ्या खासगी उद्योगांनी गोमंतकीय युवकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात आणि यापुढे नोकर भरतीसाठी मुलाखतीही गोव्यातच घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.
राज्य सरकारकडून सवलती आणि साधन सुविधा घेऊन जेव्हा उद्योग गोव्यात स्थापन होतात, तेव्हा रोजगारनिर्मितीमध्ये गोमंतकीय युवकांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. याच अनुषंगाने नोकर भरती प्रक्रिया गोव्याबाहेर घेऊन जाणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही वाढली आहे.
एमआरएफ कंपनीने फोंड्यातील युनिटमध्ये प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या २५० जागांसाठी कुडाळ-सिंधुदुर्ग येथे भरती मेळावा आयोजित केला होता. या प्रकरणामुळे राज्यात मोठा वाद उद्भवला. विरोधकांनी सरकारवर टीका करताना गोमंतकीय तरुणांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कंपन्यांना आवरा घालावा, अशी मागणी केली.
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई तसेच आरजी पक्षाने या विषयावर तीव्र आक्षेप घेतला होता. यापूर्वीही अशा प्रकारे कंपन्यांनी गुजरात व इतर राज्यांत नोकर भरतीच्या जाहिराती दिल्या होत्या, तेव्हा देखील विरोधकांनी आवाज उठविला होता. या मुद्द्यावर गोवा विधानसभेत अनेकदा चर्चा झालेली आहे.
पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, गोव्यातील उद्योगांनी स्थानिक युवकांना रोजगार देणे बंधनकारक करणार आहोत. तसेच नोकर भरतीसाठी गोव्यातच मुलाखती घेणे आवश्यक आहे. सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा घेऊन स्थानिकांना दुय्यम स्थान देता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.