गोवा खबर : बिट्स पिलानीसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचला तरी तो कुठून आला? असा गंभीर सवाल प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. प्रतीक्षा खलप यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे भाजप सरकारचे अपयश ठळकपणे समोर आले असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
अंमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून गोव्यातील युवक त्यात अडकू लागले आहेत. त्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ही बाब गंभीर असल्याने सरकारने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
अॅड. खलप म्हणाल्या, यापूर्वी कॅसिनोंनी केवळ पणजी शहरालाच विळखा घातला होता. मात्र आता हेच कॅसिनो पेडणे सारख्या देवभूमीत शिरकाव करण्याच्या तयारीत आहेत. जुगार, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय यांसारख्या गैरकृत्यांना कॅसिनोंमुळे चालना मिळते आहे आणि या सर्व बाबींमध्ये सरकार अपयशी ठरत आहे.
पत्रकार परिषदेत उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. बिट्स पिलानीतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, आता अंमली पदार्थ शिक्षण संस्थांपर्यंत पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकार युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरलेच, पण आता त्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याची जबाबदारीदेखील त्यांच्यावर आहे.
यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष महेश नडार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मिळून युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले व काँग्रेससोबत या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.